Mumbai Crime : लोकलमधून उतरून ते दोघे डबा बदलत होते तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि अनर्थ …
शिवडी स्थानकावर हे जोडपे सीएसएमटीहून जाणाऱ्या लोकल ट्रेनचा डबा बदलून दुसऱ्या डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि एकच गदारोळ झाला.
मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : मुंबईत लाखो प्रवासी दररोज लोकलने (mumbai local) प्रवास करत असतात. म्हणून लोकलला मुंबईची लाईफलाइन म्हटले जाते. मात्र याच प्रवासादरम्यान काही बरे-वाईट प्रसंग घडत असतात, ज्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. शिवडी रेल्वे स्थानकात बुधवारी अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. एका दृष्टीहीन भिकारी महिलेचा करूण अंत झाला आहे. लोकलच्या दोन डब्यांच्यामध्ये असलेल्या गॅपमध्ये पडल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला. कविता तायडे (39) असं या महिलेचं नाव आहे. ती शेगावची राहणारी असल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं.
बुधवारी दुपारी 4:30 च्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समजते. कविता आणि तिचा पती हरिदास हे दोघेही शिवडी रेल्वे स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते. एका डब्यातून उतरून ते दुसऱ्या डब्यात चढत असताना दुर्दैवाने कविता हिचा पाय घसरून तोल गेला आणि ती रेल्वेच्या दोन बोगींच्या असलेल्या फटीतून खाली रुळावर पडल्या.
दुर्दैवी प्रकार
“कविता आणि तिचा पती स्टेशनवर उतरून डबा बदलण्याचा प्रयत्न करत होते. तिचा पती पुन्हा त्याच ट्रेनमध्ये चढण्यात यशस्वी झाला पण कविता हिचा तोल गेल्याने ती रेल्वेच्या दोन डब्यांच्या फटीतून खाली पडली. दुर्दैवाने तेव्हाच लोकलही सुरू झाली आणि चाक तिच्या अंगावरून गेले,” असे रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा रुळावर पडलेल्या कविता हिच्या चेहऱ्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले.
डॉक्टरांनी मृत घोषित केले
रेल्वे पोर्टर्सच्या मदतीने तिला त्या गॅपमधून बाहेर काढण्यात आले आणि उपचारांसाठी तातडीने केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे दृष्टीहीन व्यक्तींना किती समस्यांचा सामना करावा लागतो यावर प्रकाश पडला आहे. अशा दुःखद अपघातांना रोखण्यासाठी सुरक्षा उपाय आणि जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित होते.