Mumbai Crime : मित्रांना भेटून घरी परतणाऱ्या तरूणाचे अपहरण करून मारहाण, १० हजार लुटले, एकाला अटक

| Updated on: Nov 04, 2023 | 12:28 PM

आरोपींनी त्या तरूणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील १० हजारांची रोख रक्कम घेऊन ते तेथून फरार झाले. याबाबत आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Mumbai Crime : मित्रांना भेटून घरी परतणाऱ्या तरूणाचे अपहरण करून मारहाण, १० हजार लुटले, एकाला अटक
Follow us on

मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले (mumbai crime) असून सामान्य नागरिक अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे जनसामान्यांचा जीव धोक्यात आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढूनही गुन्हे रोखण्यात पुरेसे यश आलेले नाही. दरम्यान मुंबईतून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्राला भेटून घरी परत जाणाऱ्या तरूणाला अज्ञातांनी रोखून त्याच्यावर हल्ला करत मारहाण (youth beaten up) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

एवढेच नव्हे तर त्याला मारहाण करून त्याच्याकडून १० हजार रुपये लुटून ते फरार झाले. चेंबूरमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. तर त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूण सरफराज शेख (वय २२) हा चेंबूरच्या वाशीनाका परिसरात राहतो. बुधवारी रात्री मित्राला भेटल्यानंतर दुचाकीवरून तो घरी परत जात होता. याच वेळी वाशीनाका परिसरातील नागाबाबा नगर येथे अचानक चार तरूण त्याच्या दुचाकीसमोर आले. त्यांनी त्याचे अपहरण केले आणि त्याला गोवंडी परिसरात नेऊन बेदम मारहाण केली.

एवढेच नव्हे तर त्या तरूणांनी सरफराज याच्याकडील १० हजार रुपयांची रोख रक्कम खेचून घेतली आणि पैसे घेऊन ते लगेचच तिथून फरार झाले. मारहाणीत जखमी झालेल्या सरफराजने कसेबसे आरसीएफ पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांसमोर सर्व प्रकार कथन करत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे आरसीएफ पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला. मारहाण करणाऱ्यांपैकी एका तरूणाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र त्याच्या इतर साथीदारांचा अद्याप शोध सुरू आहे. ही मारहाण नेमकी का केली, इतर साथीदार कुठे आहेत याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.