दिवाळी गोड झाली ! रेल्वे पोलिसांमुळे सापडले 12 लाखांचे दागिने

| Updated on: Nov 11, 2023 | 9:27 AM

लोकल प्रवासात रोज काही ना काही आगळ्या वेगळ्या घटना घडत असतात. मात्र मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना एक जण त्याच्याकडूल लाखोंच्या दागिन्यांची बॅगच विसरून गेला. यामुळे त्याचं धाबं दणाणलं. त्यानंतर जे घडलं ते वाचाल तर...

दिवाळी गोड झाली ! रेल्वे पोलिसांमुळे सापडले 12 लाखांचे दागिने
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us on

ब्रिजभान जैस्वार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : मुंबई लोकल आणि गर्दी हे अतूट समीकरण आहे. लाख प्रवासी रोजज लोकलने प्रवास करतात. मुंबईकराचं नशीब घड्याळाला बांधलेलं.. त्यामुळे सगळेचजण घाईघाईत, इथून तिथे प्रवास करत असतात. सकाळी प्रवास करताना ऑफीसला पोहोचण्याची घाई, तर संध्याकाळी गर्दीतून लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचण्याची घाई.. पण या घाई गडबडीमध्ये ट्रेनमध्ये एखादी वस्तू किंवा बॅग विसरल्याच्या घटनाही घडत असतात.

काही वेळा प्रवासी त्यांची बॅग, डबा, छत्री नाहीतर अजून काही गोष्टी ट्रेनमध्येच विसरतात आणि खाली उतरल्यावर त्यांच्या ते लक्षात येतं. अशावेळी त्या गोष्टी परत मिळण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. पण मुंबई लोकलच्या एका प्रवाशाला त्याचे लोकलमध्ये राहिलेले तब्बल 12 लाख रुपयांचे दागिने परत मिळाले. ऐकून विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे त्याचे लाखोचे दागिने परत मिळाले आणि त्या प्रवाशाची दिवाळी अक्षरश: गोड झाली.

चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं…

या प्रवाशाने अंबरनाथ-सीएसएमटी फास्ट लोकलमधून प्रवास सुरू केला होता. त्याच्याकडे असलेल्या दागिन्यांची पिशवी त्याने वरील रॅकमध्ये ठेवली होती. भायखळा स्टेशन आल्यावर तो ट्रेनमधून खआली उतरला. पण हात रिकामे का आहेत, असा प्रश्न पडल्यावर लाखोंच्या दागिन्यांची पिशवी आपण ट्रेनमध्ये विसरल्याचे त्याच्या लक्षात आले. पण तोपर्यंत लोकल तर पुढे निघून गेली. प्रचंड घाबरलेल्या त्या प्रवाशाने तातडीने भायखळ्यातील स्टेशनमास्तर कार्यालय गाठून तेथील अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तीच लोकल जेव्हा सीएसएमटीहून परत आली तेव्हा लोकलच्या डब्यात चढून सर्वत्र शोध घेण्यात यआला, पण दागिन्यांची ती पिशवी कुठेच सापडली नाही. त्यानंतर पीडत प्रवाशाने सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सुरू केला शोध

त्या प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि रेल्वे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी यासंदर्भात शोध घेण्यास सुरूवात केली. काही दिवसांच्या तपासानंतर खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिस अंबरनाथ येथे आरोपी हुसैन मुस्तफा हुसैन शेख यांच्या घरी ते पोहोचले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आपण हे दागिने चोरले, अशी कबुली आरोपीने दिली. आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या काम करून अवघ्या काही दिवसांतच या प्रवाशाचे तब्बल 272 ग्रॅम वजनाचे 12 लाखांचे सोन्याचे दागिने जसेच्या तसे ताब्यात घेतले आणि ते मूळ मालकाला परत केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे दिवाळी खरंच गोड झाली अशी भावना व्यक्त करत त्याने सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.