मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळयांनाच माहीत आहे. पण आता शहरातील गुन्हेगारीही इतकी वाढली आहे की निवांत झोप लागणंही दुरापास्त झालं आहे. एका दुकानाबाहेर झोपण्याच्या वादातून एका तरूणाला चक्क त्याचा जीव गमावावा लागल्याची खळबळजनक घटना मुंबईत उघडकीस आली. छोट्याशा मुद्यावरून झालेल्या वादाचा एवढा हिंसक शेवट झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे.
अखेर या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सुनील लोंबरे असे मृत तरूणाचे नाव असून सागर पवार (45) आणि प्रभू भोईर (38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यासंदर्भात व्हीपी रोड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत तरूण सुनील लोंबरे हा लोडरचे काम करत होता. घटनेच्या दिवशी तो दुकानाबाहेरील फलाटावर झोपण्यासाठी गेला होता. मात्र सागर पवार (45) आणि प्रभू भोईर (38) हे दोघे आधीच त्या जागी बसलेले होते आणि दोघेही दारूच्या नशेत होते. सुनील याने त्या दोघांना तेथून हटण्यास सांगितले. मी इथे नेहमी झोपतो, ही माझी जागा आहे, असा दावा त्याने केला. तसेच त्याने सागर आणि प्रभू या दोघांना झोडपून काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते दोघेही तिथून हलले नाहीत.
बघता बघता हा वाद चांगलाच पेटला. आणि संतापलेल्या पवार व भोईर यांनी सुनील याला बेदम मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर आरोपी भोईर याने खिशातून दोरी कापायचे कटर काढले आणि रागाच्या भरात सुनील लोंबरे याच्या मानेवर जोरात वार केले. गंभीर जखमी झालेल्या सुनीलच्या शरीरातून बराच रक्तस्त्राव होऊ लागला. हे पाहून दोन्ही आरोपी तेथून फरार झाले. गस्तीवरील पोलिसांनी सुनील याला जखमी अवस्थेत पाहिले आणि तातडीने जेजे रुग्णालयात नेले. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सुनीलवर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी पवार आणि भोईर यां दोघांना घटनेच्या काही तासांतच अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. सुरुवातीला, त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुनील लोंबरे याचे निधन झाल्यावर त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.