कर्जबाजारीपणामुळे तणावात होता तरुण, जीवन संपवण्याचा विचारही केला; पण…
गुगलवर वारंवार आत्महत्या करण्याचे पर्याय शोधत होता. गुगलने ही माहिती इंटरपोल आणि सीबीआयसारख्या यंत्रणांना कळवली. यानुसार या यंत्रणांनी ही माहिती मुंबई पोलिसांना शेअर केली आणि संबंधित तरुणाचा आयपी अड्रेसही दिला.
मुंबई / कृष्णा सोनारवाडकर (प्रतिनिधी) : कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्येतून जीवन संपवण्याचा विचार तरुण करत होता. यासाठी आत्महत्या करण्याचे पर्याय गूगलवर सर्च केले. मात्र तरुणाच्या या अॅक्टिव्हिटीची माहिती गूगलने इंटरपोल आणि सीबीआयला दिली अन् पोलिसांना तरुणाचा जीव वाचवण्यास यश आले. संबंधित तरुण हा पेशाने आयटी इंजिनियर असून, तो मागच्या काही दिवसांपासून मुंबईत राहत होता. गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या अधिकाऱ्यांनी आयपी अड्रेसच्या माध्यमातून या तरुणाला कुर्ला परिसरातून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली. इंटरपोल आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी मुंबई पोलिसांना वेळीच माहिती पुरवल्याने एका 25 वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. मुंबई पोलिसांनी अवघ्या दोन तासात सर्व यंत्रणा लावून केलेल्या या कामगिरीचे विशेष कौतुक सध्या होत आहे.
‘असा’ घेतला तरुणाचा शोध
गुगलवर वारंवार आत्महत्या करण्याचे पर्याय शोधत होता. गुगलने ही माहिती इंटरपोल आणि सीबीआयसारख्या यंत्रणांना कळवली. यानुसार या यंत्रणांनी ही माहिती मुंबई पोलिसांना शेअर केली आणि संबंधित तरुणाचा आयपी अड्रेसही दिला.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता मुंबई पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सर्व यंत्रणा कामाला लावून आयपी अड्रेसच्या माध्यमातून या तरुणाला शोधून काढण्याच्या सूचना दिल्या.
कर्जामुळे तणावात होता तरुण
गुन्हे शाखेने आयपी अॅड्रेसच्या आधारे तरुणाला कुर्ला परिसरातून शोधून काढले. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान त्या तरुणाने अनेक खुलासे केले. शिक्षणासाठी घेतलेले शैक्षणिक कर्ज तसेच बँकेकडून काढलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नसल्याने तो प्रचंड तणावात होता.
अखेर नैराश्येतून त्याने आत्महत्या करण्याचं ठरवल्याचं त्याने चौकशीत पोलिसांना सांगितलं. याआधीही त्याने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती पोलिसांना मिळाली.
कुर्ल्याच्या किस्मत नगर परिसरात राहणाऱ्या या तरुणाने मागच्या काही दिवसात ‘painless sucide’ आणि ‘easy way to sucide’ म्हणजेच आत्महत्येसाठी सोपे पर्याय अशा गोष्टी गुगलवर सर्च केल्या होत्या.
गुगलच्या नियमावलीनुसार वारंवार अशा प्रकारच्या गोष्टी जर कोणी सर्च करत असेल तर त्याची नोटिफिकेशन गुगलला प्राप्त होते. त्यानंतर संबंधित तपास यंत्रणांना गुगलकडून माहिती पुरवली जाते असं तज्ज्ञांनी सांगितलं.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार जे आक्षेपार्ह शब्द आहेत ते जर कोणी सर्च करत असेल तर त्यावर गुगलकडून स्वतंत्र पद्धतीने काम करण्यात येते. जर तसं काही संशयास्पद आढळलं तर यंत्रणाना अलर्ट केलं जातं.
या सगळ्या यंत्रणांच्या तत्परतेमुळे आत्महत्येच्या मार्गावर असलेल्या 25 वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी या तरुणाचे समुपदेशन करून पालकांना याबाबतची माहिती दिली. त्यांनतर त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आलंय.