मुंबई : बकऱ्यावरुन सुरु झालेला वाद अजून थांबलेला नाही. ठाणे जिल्ह्यात मीरा-भाईंदर येथील हाय सोसायटी परिसरात बकऱ्याच्या कुर्बानीवरुन मोठा वाद झालाय. मंगळवारी संध्याकाळी या वादाची सुरुवात झाली. आतापर्यंत 35 ते 40 जणांविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला आहे. जे.पी. इन्फ्रा सोसायटीच्या एस्टेला बिल्डिंग परिसरात राहणाऱ्या मोहसीन खान नावाच्या व्यक्तीला बकऱ्याची कुर्बानी द्यायची होती.
पण हिंदू संघटना आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्याला आपली योजना बदलावी लागली. बुधवारी 28 जूनला पहाटे 4 च्या सुमारास बिल्डिंगमधून दोन्ही बकऱ्यांना बाहेर नेण्यात आलं.
पुन्हा तणाव का वाढला?
मोहसीन खानची बायको यास्मीनने काशीमीरा पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर नोंदवल्यानंतर तणाव पुन्हा एकदा वाढला. यास्मीनने सोसायटीच्या 8 जणांविरोधात एफआयआर नोंदवली. त्याशिवाय 35 ते 40 अज्ज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवलाय.
नवऱ्याला दहशतवादी म्हटल्याचा आरोप
बकरा ठेवण्यासाठी सोसायटीकडे जागा मागितली होती. पण सोसायटीने परवानगी दिली नाही. त्यामुळे नाईलाजाने घरी बकरा आणावा लागला, असं यास्मीनने म्हटलं आहे. मंगळवारी सकाळी पहाटे चारच्या सुमारास माझे पती मोहसीन दोन बकरे घेऊन घरी आले, असं यास्मीनने एफआयआरमध्ये म्हटलं आहे. यास्मीनने ते दोन्ही बकरे आपल्या बाल्कनीमध्ये बांधले. त्यानंतर कपडे खरेदी करण्यासाठी म्हणून यास्मीन पतीसोबत गेली. रात्री 8.30 च्या सुमारास घरी आलो, त्यावेळी आपली गाडी रोखून वॉचमनला गाडीची तपासणी करण्यास सांगण्यात आलं. नवरा मोहसीनला धक्का-बुक्की झाली. दहशवतादी सुद्धा म्हटलं, असं यास्मीनने तिच्या FIR मध्ये म्हटलं आहे.
सोसायटीतील रहिवाशांच काय म्हणणं?
जे पी इन्फ्रा सोसायटीच्या एस्टेला बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितलं की, सोसायटीमध्ये कुठलाही प्राणी आणून त्याला कापण्यास मनाई आहे. मात्र, असं असतानाही मोहसीन खान मंगळवारी पहाटे दोन बकरे घेऊन आले. बिल्डिंग परिसरातच त्यांना कुर्बानी द्यायची होती. सोसायटीतील लोकांना याबद्दल समजलं, त्यावेळी त्यांनी मोहसीन खानला समजावण्याचा प्रयत्न केला. पण मोहसीन खान आणि त्याची बायको यांनी शिवीगाळ केली. सोसायटीतील वाढता विरोध पाहून त्यांनी आपल्या बाजूच्या काही लोकांना बोलावलं.
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणाची माहिती मिळताच, मीरा-भाईंदर पोलिसांनी तात्काळ पावल उचलली. प्राण्याला आणून त्याला कापणं सोसायटी नियमात बसत नाही, हे मोहसीनला पोलिसांनी समजावलं. सगळ्यांचा विरोध आणि समजवाल्यानंतर अखेर मोहसीन बकऱ्याला बिल्डिंगच्या बाहेर घेऊन गेला. पण आता मोहसीनच्या बायकोने एफआयआर नोंदवल्यामुळे हे प्रकरण शांत होताना दिसत नाहीय.