जमीन माझ्या नावावर का केली नाही?, जावयाकडून दोन सासवांची निर्घृण हत्या, महिनाभरानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या
लातूर जिल्ह्यातल्या गोटेवाडी शिवारात जमिनीच्या वादातून जावयानेच सासू आणि सासूच्या मावस बहिणीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सासूने तिची जमीन आपल्या नावावर का केली नाही, याचा राग मनात धरून दोन वृद्ध मावस बहिणींची आरोपीने निघृणपणे हत्या केली
लातूर : लातूर जिल्ह्यातल्या गोटेवाडी शिवारात जमिनीच्या वादातून जावयानेच सासू आणि सासूच्या मावस बहिणीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सासूने तिची जमीन आपल्या नावावर का केली नाही, याचा राग मनात धरून दोन वृद्ध मावस बहिणींची आरोपीने निघृणपणे हत्या केली आणि त्यांचे मृतदेह गोटेवाडी शिवारातल्या शेततळ्यात दफन करुन टाकले होते. अखेर महिनाभरानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जमिनीच्या वादातून दोन सासवांची हत्या
औसा तालुक्यातल्या गोटेवाडी इथं राहणाऱ्या शेवंताबाई सावळकर यांनी त्यांची जमीन मुलीच्या नावावर केली होती. ही जमीन आपल्या नावावर का केली नाही? याचा राग मनात धरुन जावई- राजू नारायणकर याने शेवंताबाई यांची हत्या केली.
हत्या करताना शेवंताबाईंच्या मावस बहीण त्रिवेणीबाई सोनवणे ह्या मध्ये पडल्या असता त्यांचीही हत्या करून आरोपीने दोघींच्या मृतदेहाचे तुकडे शेततळ्यात दफन केले होते. वृद्ध दोघी बहिणी हरवल्याची तक्रार आल्यावरून पोलिसांनी तपास करीत या हत्येचा भांडाफोड केला आहे. हत्येचा उलगडा झाल्यानंतर लातूर पोलिसांनी आरोपी राजू नारायनकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हत्येचा उलगडा कसा झाला?
वृद्ध दोघी बहिणी हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिस स्थानकात केली. पोलिसांनी तपास सुरु केला. पण तपास करुनही वृद्ध महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आलं. तपासात शेत जमिनीच्या वादाची माहिती पोलिसांसमोर आली. जावई मुंबईमध्ये काम करत असल्याने पोलीस पथक मुंबईकडे रवाना करण्यात आले. पोलिसांना जावयावर संशय होता… चौकशी दरम्यान बराच काळ त्याने उडवाउडवीची उत्तरं दिलं.. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
(murder of two Sister by Son in law over property issue)