संतोष सादुडे हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट; …म्हणून आरोपींनी रचला अपहरणाचा बनाव
वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथे एका १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा बनाव रचून खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व कट मुलाच्या निर्घृण हत्येवर पडदा टाकण्यासाठी रचण्यात आला होता.

वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथे एका १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा बनाव रचून खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व कट मुलाच्या निर्घृण हत्येवर पडदा टाकण्यासाठी रचण्यात आला होता. पोलिसांच्या जलद तपासामुळे अवघ्या काही तासांत हा गुन्हा उघडकीस आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
१२ मार्च रोजी अनिकेत संतोष सादुडे (वय १४, रा. बाभुळगाव) हा गावातील एका लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता. मात्र, रात्री दोन वाजले तरी तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला असता, त्यांच्या घराजवळ एक पत्र आढळले. या पत्रात अनिकेतचे अपहरण केल्याची माहिती देत ६० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तसेच, पैसे न दिल्यास त्याला ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती.
अपहरणाची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. सायबर सेल आणि स्थानिक पोलीस एकत्र येत तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू करण्यात आला.
आरोपी प्रणय पदमणे आणि शुभम इंगळे या दोघांवर सुरुवातीपासूनच संशय होता. मात्र, त्यांनी पोलीस तपासाला चकवा देण्याचा प्रयत्न केला. वारंवार चौकशी आणि त्यातील विसंगती लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक तपास केला. अखेर प्रणय पदमणे याने कबुली दिली की, त्याने आणि शुभम इंगळेने अनिकेतला फूस लावून गावाबाहेर नेले आणि १३ मार्चच्या पहाटे गळा दाबून त्याचा खून केला.
अनिकेतचा खून केल्यानंतर पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने वळवण्यासाठी आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी आरोपींनी बनाव रचला. त्यांनी अपहरणाची बनावट कथा तयार करत खंडणीसाठी धमकीपत्र ठेवले. मात्र, पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे हा कट उघडकीस आला आणि आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. या घटनेनं खळबळ उडाली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू आहे.