प्रेमाला अंतिम निरोपाची प्रतिक्षा! 72 तासापासून बॉयफ्रेंडच्या दरवाजावर गर्लफ्रेंडचा मृतदेह; अंत्यसंस्कारासाठी कोणीच येईना
गेल्या तीन दिवसांपासून गर्लफ्रेंडचा मृतदेह हा प्रियकराच्या घराबाहेर होता. गावकरी अंत्यसंस्कारासाठी तयार नाहीत. पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

बिहारमधील समस्तीपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. गेल्या ३ दिवसांपासून एका मुलीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आलेले नाहीत. मृतदेहातून अक्षरश: दुर्गंधी येत आहे. तरीही गावकरी अंत्यसंस्कारासाठी तयार नाहीत. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधिकारीही गावकऱ्यांना सतत समजावून सांगत आहेत, मात्र ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. स्थानिक प्रमुखांनीही त्यांच्या बाजूने पुढाकार घेतला आहे. मात्र, मृतदेहावर अंतिम संस्कार होऊ शकले नाहीत.
मनीषा कुमारी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचे वय 26 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही तरुणी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील हट्टा मल्ला टोली येथील रहिवासी होती. समस्तीपूरच्या गंगौरा येथील बाबुलसोबत तिचे प्रेमसंबंध होते. दरम्यान, मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. गेल्या ३ दिवसांपासून प्रियकर बाबुलच्या घराबाहेर तिचा मृतदेह घेऊन गावकरी बसले आहेत. ते पाहून बाबुल आणि त्याचे कुटुंबीय घरातून पळून गेले आहेत.
वाचा: बॅग घेऊन जात होती… पोलिसांनी रोखलं, बॅग तपासताच मिळाली अशी गोष्ट… बोबडीच वळली
9 मार्च रोजी मनीषाचा मृतदेह मुझफ्फरपूरच्या मल्ला टोला येथील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. ती आपल्या मुलीसह घरी एकटीच राहत होती. समस्तीपूरच्या बाबुलसोबत तिचे प्रेमसंबंध होते. मुलीनेच गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
आता गेल्या तीन दिवसांपासून समस्तीपूर येथील बाबुलच्या घराबाहेर मृतदेहासोबत मुलीचे नातेवाईक आणि गावकरी बसले आहेत. बाबुलमुळे मुलीला जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आता बाबुलच येऊन अंतिम संस्कार करणार अशी मागणी देखील केली आहे. मनिषाच्या पतीनेच तिची हत्या केल्याचा संशयही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
घराबाहेर पोलिसांची फौज तैनात
समस्तीपुर येथील बाबूलच्या घराबाहेर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाबूल आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे. तसेच गावकऱ्यांना देखील समजावले जात आहे की मृतदेह असा जास्त वेळ ठेवणे योग्य नाही.