ज्याच्यासाठी कोर्टात लढला, वकिलाने त्याचाच खून केला, मुलगाही सामील; नागपुरात काय घडलं ?
ज्या पक्षकाराला न्याय मिळावा म्हणून न्यायालयात त्याची बाजू मांडली, त्याचा खटला लढला, त्याच व्यक्तीची वकिलाने कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्याकांडामध्ये त्या वकिलाच्या मुलानेही त्याची साथ दिली.
ज्या पक्षकाराला न्याय मिळावा म्हणून न्यायालयात त्याची बाजू मांडली, त्याचा खटला लढला, त्याच व्यक्तीची वकिलाने कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्याकांडामध्ये त्या वकिलाच्या मुलानेही त्याची साथ दिल्याचे समोर आले आहे. रविवारी मध्यरात्री हे हत्याकांड झाले असून जरीपटका पोलिसांनी आरोपी वकील व त्याच्या मुलाला अटक केली. हरीश कराडे (वय 60) असे मृत इसमाचे नाव असून ॲड.अश्विन मधुकर वासनिक (वय 56) आणि अविष्कार अश्विन वासनिक (वय 23) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
का केली हत्या ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हरीश कराडे आणि ॲड.अश्विन मधुकर वासनिक हे एकाच परिसरत रहायचे. त्यांची खूप पूर्वीपासून एकमेकांशी ओळख होती. मृतक हरीश कराडे हे वायुसेनेत कार्यरत होते. मात्र काही कालावधीपूर्वी त्यांना वायुसेनेतून निलंबित करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात न्याय मागण्यासाठी हरीश कराडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा ॲड.अश्विन मधुकर वासनिक यांनीच कराडे यांची बाजू न्यायालयात मांडली होती.
काही कालावधीनंतर हरीश कराडे यांचा निलंबनाचा आदेश रद्द करून त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आले. तेव्हापासूनच हरीश कराडे आणि अश्विन वासनिक यांच्यात मैत्री झाली. दोघांचेही कौटुंबिक संबंध होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी हरीश हे वायुसेनेतून सेवानिवृत्त झाले होते. आरोपी वकील आणि हरिष कराडे हे पूर्वी एकाच परिसरात राहत होते. मात्र काही काळाने अश्विन वासनिक हे इंदोरात रहायला गेले. मात्र त्या दोघांनाही एकत्र गप्पा मारण्याची, दारू पिण्याची सवय होती.
पैशांवरून वाद झाला आणि जीवच घेतला
घटनेच्या दिवशी, रविवारी रात्री हरीश हे अश्विन वासनिक यांच्या घरी गेले. तेथे मध्यरात्रीपर्यंत त्यांनी दारू प्यायली. मात्र थोड्या वेळाने त्या दोघांमध्ये पैशांवरून भांडण झालं आणि बघता बघता तो वाद चांगलाच पेटला. या वादाचे रुपांतर शिवीगाळात झाले. त्यानंतर अश्विन आणि त्याचा मुलगा अविष्कार या दोघांनी मिळून हरीश यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हरीश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कराडे यांची पत्नी सोनाली कराडे यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर जरीपटका ठाण्याचे उपनिरीक्षक मारोती जांगीलवाड यांनी गुन्हा दाखल करून अश्विन आणि त्यांचा मुलगा अविष्कार या दोघांनाही अटक केली. पुढील तपास सुरू आहे.