असली नोटांमध्ये नकली नोटा… नागपूरमध्ये फेक करन्सीचं रॅकेट उघड; नोटांवर लिहिलं होतं, बँक ऑफ…
नागपुरात बनावट नोटा विकणारी टोळी पकडण्यात आली आहे. ही टोळी एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या जागी चार लाख रुपयांच्या बनावट नोटा देत असे. नागपूर पोलिसांनी या टोळीकडून 25 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून 4 जणांना अटकही केली आहे. हे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना अडकवायचे.
नागपूरमध्ये पोलिसांनी एका भामट्या टोळीचा पर्दाफाश केला आहे, जे खऱ्या नोटांच्या बजल्यात नकली नोटा (Fake currency) द्यायचे. भामट्यांची ही संपूर् टोळी हायटेक पद्धतीने काम करायची आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करायचे. पटापट श्रीमंतर होण्याचे आमिष दाखवत हे भामटे लोकांना लुबाडायचे. पोलिसांनी अखेर ४ जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. नागपूर पोलिसांनी या टोळीकडून 25 लाख रुपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत.
असा उघड झाला गुन्हा
खरंतर नागपूरमधील रहिवासी असलेले राहुल वासुदेव ठाकुर हा तरूण सोशल मीडियाच्या माध्यमातून या टोळीच्या संपर्कार आला होता. या टोळीतील काही लोकांनी व्हॉट्सॲप कॉल द्वारे त्याच्याशी संपर्क साधला. 1 लाख रुपयांच्या नोटांच्या बदल्यात 4 लाखांच्या नोटा मिळतील असा दावा, त्यांनी केला. आपल्याकडे नोटा छापण्याचं मशीन असल्याचंही त्यांनी भासवलं. मात्र राहुल याला शंका आली आणि त्याने थेट नागपूर पोलिसांशी संपर्क साधून याप्रकरणाची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. या टोळीतील लोकांशी राहुलने बोलणं सुरू ठेवलं आणि त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर, नागपूरच्या सीताबर्जी भागात भेटण्याचे निश्चित झाले. त्यानंतर राहुल हा 80 हजार रुपये घेऊन घटनास्थळी पोहोचला असता, टोळीतील सदस्य त्याच्यावर तुटून पडले आणि त्याला लुटू लागले. मात्र पोलिसांचे पथकही तिथेच होते, त्यांनी लागलीच कारवाई करत त्या भामट्यांना ताब्यात घेतले. सतीश ध्यानदेव गायकवाड़ , गौतम राजू भलावी, शुभम सहदेव प्रधान आणि मोनू उर्फ शब्बीर या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
नोटांची 44 बंडले जप्त
पोलिसांना त्यांच्याकडून नोटांची 44 बंडले सापडली. त्यामध्ये फक्त 500 रुपयांच्या नोटा होत्या, पण गोम अशी होती की या बंडलामध्ये फक्त समोर आणि मागे 500 रुपयांच्या खऱ्या नोटा होत्या, बाकीच्या सर्व नोटा या खोट्या होत्या. त्या बनावट नोटांवर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिले होते. पोलिसांनी 25 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत, ज्या 500 रुपयांच्या नोटांची कॉपी आहे. तसेच त्यांच्याकडून सहा मोबाईल फोन, चेन आणि अंगठ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. या गुंडांनी आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे. हे रॅकेट कधीपासून सक्रिय होते, या सगळ्याचा तपास सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.