तरुणीने सिगारटेचा धूर तोंडावर उडवला, तरुण भांडायला गेला अन् जीवच गमावला; नागपुरातील हत्येचा थरार सीसीटीव्हीत
सिगारेटच्या धुरावरून रणकंदन घडलं आणि एका तरूणाला त्याचा जीव गमवावा लागला. नागपूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेनेन शहरात एकच खळबळ माजली आहे. सिगारेट ओढताना तोंडावर धूर उडवला म्हणून झालेल्या वादात एका तरूणाचं आयुष्यचं संपलं.
सिगारेट पिणं हे आरोग्यासाठी आणि आपल्या आयुष्यासाठी अतिशय घातक असतं. हे माहीत असूनही अनेक जण सिगारेट ओढता, धूम्रपान करतात. याच सिगारेटच्या धुरावरून रणकंदन घडलं आणि एका तरूणाला त्याचा जीव गमवावा लागला. नागपूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेनेन शहरात एकच खळबळ माजली आहे. सिगारेट ओढताना तोंडावर धूर उडवला म्हणून झालेल्या वादात एका तरूणावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्याचा जीव गेला. रणजित राठोड असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर एक तरूणी आणि तिच्या मित्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर आल आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत हत्येची ही घटना घडली.
सिगारेटचा धूर तोंडावर सोडल्यामुळे भडकला…
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणजित राठोड (वय 28) असे या मृत तरुणाचं नाव आहे. जयश्री पानझरे(वय 30),सविता सायरे (वय 24) आणि आकाश राऊत (वय 26) अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत. मृत रणजित राठोड याचे नागपूरमध्ये कपड्यांचे दुकान आहे. रणजित आणि या घटनेतील आरोपी जयश्री या दोघांनी एका पानठेल्यावरून सिगारेट विकत घेतली. दोघेही तिथल्याच पसिरात उभे राहून धूम्रपान करत होते. सिगारेट ओढत असताना जयश्री हिने सिगारेटचा धूर रणजितच्या तोंडावर उडवला. त्याला हा प्रकार अजिबात न आवडल्याने रणजितने जयश्रीला जाब विचारला, दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. त्यावेळी जयश्री मैत्रीण सविताही तिथेच होती. त्या दोघींनी रणजितला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
मात्र हे प्रकरण तिथेच थांबलं नाही. संतापलेल्या जयश्रीने तिच्या आणखी काही मित्रांना फोन केला आणि तिथे बोलावलं. तिचे मित्र लागलीच तिथे आले. रणजित हा तेव्हा तिथेच थोड्याच अंतरावर उभा होता. ते पाहून सर्व आरोपींनी त्याच्यावर एकत्रित हल्ला चढवला. त्याच्या मारहाणाीत रणजित गंभीररित्या जखमी झाला. ते पाहून आजूबाजूच्यांनी त्याला उपचारांसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचारांदरम्यान रणजित याचा मृत्यू झाला.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रणजितचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. जयश्री ही शिवीगाळ करत असताना रणजतिने मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. तो व्हिडीओ आणि हल्ला झाला त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही हा प्रकार कैद झाला. त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकत अटक केली. याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.