दोन हजाराच्या बनावट नोटा, पोलिसांनी इतक्या रुपयांच्या नोटा केल्या जप्त
हॉटेल चालकाने आपल्या नोकरांना त्या व्यक्तीकडे लक्ष ठेवायला सांगितलं आणि तो फसला.
नागपूर : सदर पोलिसांनी बनावट 500 आणि 2000 च्या नोट छापून मार्केटमध्ये चालविणाऱ्या एका आरोपीला अटक केली. नोट छापण्यास मदत करणाऱ्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले. नोटा चालविण्यासाठी 20 रुपयांचा नाश्ता करून 480 रुपये वापस घ्यायचा. पण, पोलिसांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी आरोपीला जेरबंद केले. शिवाय पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्यात. त्यामुळं पाचशे किंवा दोन हजार रुपयांच्या नोटा घेताना सावध राहण्याची वेळ आली आहे.
नागपूरच्या छावणी परिसरातील एका नाश्ता पॉइंटवर विजय थोराइत नावाचा आरोपी नाश्ता करायला गेला. त्याने 20 रुपयांचा नाश्ता केला आणि 500 ची नोट दिली. 480 रुपये वापस घेतले. हा प्रकार दोन दिवस चालला. मात्र हॉटेल मालकाला संशय आला. त्याने नोट चेक केली असता ती बनावट दिसून आली.
मग हॉटेल चालकाने आपल्या नोकरांना त्या व्यक्तीकडे लक्ष ठेवायला सांगितलं आणि तो फसला. त्याला पकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याला झटका दाखविताच त्याने सगळा प्रकार सांगितला.
लवकर श्रीमंत होण्याच्या नादात त्याने एका प्रिंटिंगच्या दुकानदाराच्या मदतीने नोटा छापल्या होत्या. मात्र प्रिंटिंग करणाऱ्याला त्याने ओळखीचा फायदा घेत भावाच्या लग्नात उडवायला पाहिजे, असं सांगत छपाई करून घेतली.
त्यासाठी त्याने मोठा अभ्यास करून हुबेहूब नोट बनविल्या. त्याच्याकडून पोलिसांनी 2 लाखाच्या जवळ 500 आणि 2000 च्या बनावट नोटा जप्त केल्या. अशी माहिती सदर पोलीस ठाण्याचे पीआय विनोद चौधरी यांनी दिली.
झटपट श्रीमंत होण्याचा लोभ करत त्याने हे कृत्य केलं. मात्र आता त्याच्या चांगलाच अंगलट आलं. प्रिंटिंग करून देणारा सुद्धा यात फसला. त्यामुळं दोघांनाही आता जेलही हवा खावी लागणार आहे. आतापर्यंत त्यानं कुठंकुठं बनावट नोटा वापरल्या. कुणा-कुणाची फसवणूक केली, हेसुद्धा जाणून घ्यावं लागणार आहे.