नागपुरात 33 एटीएम फोडले, परराज्यातही चोऱ्या, अखेर असे अडकले
नागपुरात यांनी 33 ठिकाणी चोरी केल्याचं उघड झालं.
सुनील ढगे, Tv 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : विशिष्ट प्रकारच्या स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून एटीएम फोडायचे. 33 एटीएम फोडणाऱ्या यूपीमधील कुख्यात गॅंगला अटक करण्यात आली. नागपूरच्या तहसील पोलिसांनी तिघांना गजाआड केलं. मुंबई, ठाण्यासह देशातील वेगवेगळ्या शहरात या गॅंगने एटीएम फोडीच्या घटना केल्या.
नागपूरच्या तहसील पोलिसांनी युपीमधील एका गॅंगला अटक केली. या गँगने आतापर्यंत नागपुरात 33 एटीएममध्ये चोरी केली. ते एक विशिष्ट प्रकारच्या स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे काढतात.
एटीएममध्ये जाऊन आपल्या जवळच्या विशिष्ट प्रकारच्या स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने एटीएममध्ये तांत्रिक बिघाड आणतात. मग त्या ठिकाणी पैसे काढायला गेलेल्या माणूस पैसे विड्रॉल करतो. मात्र ते पैसे बाहेर न निघता आतच अडकून पडलेले असतात.
तांत्रिक बिघाड समजून ग्राहक तिथून निघून जातो. नंतर त्या ठिकाणी दबा धरून बसलेले हे चोरटे आतमध्ये जाऊन ते पैसे काढून घेतात. अशाप्रकारे नागपुरात यांनी 33 ठिकाणी चोरी केल्याचं उघड झालं. पुणे, मुंबईसह देशातील वेगवेगळ्या शहरात सुद्धा यांनी हात साफ केले आहेत.
पोलिसांनी या गॅंगमधील तिघांना अटक केली. यांनी आणखी कुठे कुठे हे कारनामे केले, याचा शोध घेत आहेत. अशी माहिती तहसील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली.
एटीएममध्ये चोरी करणे साधं काम नाही. मात्र या गॅंगने गुगलच्या साहाय्याने हे प्रशिक्षण घेतलं. यांनी देशाच्या वेगवेगळ्या शहरातील एटीएममध्ये आपले कारनामे दाखविले. मात्र आता ते पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे ही गॅंग किती मोठी आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.