खिडकी तोडून बँक लुटली; पण, बँक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित सापडले
या चारचाकी वाहनाच्या समोरच्या काचावर एक वाक्य लिहिले होते. हेच वाक्य पोलिसांना आरोपीपर्यंत घेवून गेले. या वाहनाचा पोलिसांनी शोध घेतला.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत घुग्घुस मार्गावरील एमआयडीसी परिसरातील स्टेट बँक इंडिया शाखेत (Bank of India) चोरट्यांनी लॉकर तोडून 14 लाख रुपये पळविले होते. याप्रकरणात दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. बँक लुटणारी मोठी टोळी असल्याने आणखी काही आरोपींच्या शोध पोलीस घेत आहेत. बँकेला सलग 2 दिवस सुट्या असल्याच्या काळात हा चोरीचा प्रकार घडला होता. बँक पूर्ववत सुरु झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना लॉकर तोडून दिसले. चोरट्यांनी अनेक दिवसांपासून या बँकेवर पाळत ठेवली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) दरोड्याची घटना येणार नाही, याची काळजी या चोरट्यांनी घेतली. त्यानंतर बँकेच्या इमारतीची खिडकी तोडून आत प्रवेश केला. गॅस कटरने लॉकर तोडले. या गडबडीत लॉकरमधील काही नोटासुद्धा जळाल्या.
चौदा लाख घेऊन पसार
बँकेतील सुरक्षा यंत्रणा आधी बंद केली. त्यामुळे लॉकर सहजरित्या त्यांनी गॅस कटरने कापले. त्यातील चौदा लाख रुपये घेऊन ते पसार झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज संग्रहित यंत्रणाही स्वतःसोबत घेऊन गेले. अखेर चार दिवसांनंतर दोन आरोपींना पोलिसांनी शोधून काढले आहे. आरोपी चंद्रपूर शहरातीलच असल्याची माहिती आहे. बँक फोडी प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
संशयास्पद वाहन सापडले आणि…
या बँक परिसराच्या मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लागले आहेत. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तेव्हा घटना घडल्यानंतर एक संशयास्पद वाहन या मार्गाने रात्री गेल्याचे समोर आले. या चारचाकी वाहनांचा समोरच्या काचावर एक वाक्य लिहिले होते. हेच वाक्य पोलिसांना आरोपीपर्यंत घेवून गेले. या वाहनाचा पोलिसांनी शोध घेतला. पहिला आरोपी हाती लागला. त्यानंतर दुसऱ्याला अटक केली. पहिला अटकेतील आरोपी या वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. दोन्ही अटकेतील आरोपी चुलत भाऊ आहेत. रक्कम मोठी असल्याने पोलीस सावधानतेने सर्व आरोपींचा शोध घेत आहेत. चोरांनी मोठी शिताफी केली. पण, पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्यातून ते सुटू शकले नाहीत.