नागपूर : पित्यानेच स्वतःच्या सात वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. आकाश वाघाडे असे आरोपी पित्याचे नाव आहे. पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बापानेच आपल्या मुलाला एका महिलेच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाची सुटका केली असून, प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
आकाश वाघाडे याचे पत्नीसोबत वाद सुरु आहेत. त्यामुळे त्याची त्याच्यापासून वेगळी राहते. आकाशला तीन मुले असून, मुलेही पत्नीसोबतच राहत होती. दरम्यान, आकाशने त्यापैकी सात वर्षाच्या आपल्या मुलाला पत्नीकडून कामाच्या ठिकाणा नेले.
एक महिला आकाशच्या कामाच्या ठिकाणी आली. त्या महिलेला रात्रभर राहण्याची सोय नव्हती म्हणून ती आकाशच्या कामाच्या ठिकाणी थांबली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती निघाली तेव्हा आकाशने तिला आपल्या मुलाला सोबत घेऊन जाण्यास सांगितले.
मुलाला संध्याकाळी परत आपल्याकडे सोडण्यास सांगितले. मात्र ती संध्याकाळी परतलीच नाही. त्यामुळे आकाशने बेलतरोडी पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली.
तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ मुलाचा शोध सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी शोधाशोध करुन सदर महिलेला शोधून काढलं. महिला सापडल्यानंतर खरा प्रकार समोर आला.
बापानेच आपल्या सात वर्षाच्या मुलाला एका महिलेच्या स्वाधीन केलं आणि स्वतःच मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवल्याचे पोलीस तपासात उघड झाले. वाघाडे याने हे कृत्य का केले याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
गेल्या काही दिवसात नागपूरमध्ये लहान मुलांना चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी टोळी पकडली. त्यामुळे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र त्यात काही वेगळाच प्रकार पुढे आला त्यामुळे पोलिसही थक्क झाले.