नागपूर : कौटुंबिक कलहातून एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीसह अंबाझरी तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. आधी पतीला ‘गुड न्यूज’चा मॅसेज केला, मग जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्पना पंडागळे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.
कल्पनाचा 2018 मध्ये रवी पंडागळे याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघा पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. यातून पतीकडून वारंवार छळही होत होता. पतीच्या त्रासाला कंटाळून कल्पना सासरचे घर सोडून वडिलांकडे राहत होती.
सोमवारी सकाळी ती घराबाहेर गेली. त्यानंतर संध्याकाळी अंबाझरी तलावाजवळ आली. मुलीला खाऊ पिऊ घातले. मग पतीला ‘उद्या गुड न्यूज मिळेल’ असा मॅसेज केला. मग मुलीसह तलावात उडी घेतली.
तलावाजवळ उपस्थित असलेल्या दक्ष नागरिकांनी अंबाझरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अखेर मंगळवारी सकाळी दोन्ही मृतदेह शोधण्यास यश आले.
तलावात उडी घेण्याआधी एका पिशवीत पती, वडिल आणि काही नातेवाईकांचे नंबर, तसेच काही कागदपत्रे ठेवली होती. याआधारे पोलिसांनी महिलेची ओळख पटवत तिच्या घरच्यांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.