आधी ऑनलाईन गेमने कर्जबाजारी केले, मग नातेवाईकांनी लुटले; महिलेसोबत नेमके काय घडले?
जरीपटका पोलिसांनी नातेवाईक असलेल्या बंटी बबलीला फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. अमित तिवारी आणि रेणुका तिवारी अशी अटक करण्यात आलेल्या बंटी बबलीची नावे आहेत.
सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर : ऑनलाईन गेमने केवळ मुलांना आणि तरुणांनाच वेड लावले नाही, तर महिलांचाही यात मोठा सहभाग आहे. मात्र हे ऑनलाईन गेम खेळणे (Playing Online Game) एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी झालेल्या महिलेला नातेवाईकांनी 15 लाखाला चुना (15 Lakh Fraud) लावल्याची घटना नागपुरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात (Jaripataka Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जरीपटका पोलिसांनी नातेवाईक असलेल्या बंटी बबलीला फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. अमित तिवारी आणि रेणुका तिवारी अशी अटक करण्यात आलेल्या बंटी बबलीची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
नागपुरातील एका महिलेला ऑनलाईन गेम खेळण्याचा नाद लागला होता. गेमच्या वेडापायी ती कर्जबाजारी झाली होती. याबाबत तिने आपले नातेवाईक असलेले अमित तिवारी आणि रेणुका तिवारी यांना विश्वासाने याबाबत सांगितले. मात्र तिवारी दाम्पत्याने महिलेला मदत करण्याऐवजी तिचा गैरफायदा घेतला.
महिलेने कर्ज फेडण्यासाठी एका नातेवाईकाकडून एक लाख रुपये उधार घेतले होते. मात्र नातेवाईकांनी पैसे परत मागितल्यानंतर तिने नातेवाईक असलेल्या तिवारी दाम्पत्याकडे पैसे मागितले.
महिलेला ब्लॅकमेल करत 15 लाख उकळले
तिवारी दाम्पत्याने तिला पैसे देतो सांगत सासऱ्याच्या इन्शुरन्सचे पैसे आल्यावर पैसे परत देणार असं स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले. त्यावर धोक्याने तिची सही घेत तिला ब्लॅकमेल करायला सुरवात केली. महिलेकडून एका महिन्यात 15 लाख रुपये उकळले.
दाम्पत्याला पोलिसांकडून अटक
मात्र तिवारी दाम्पत्याची मागणी वाढत चालल्याने महिलेने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर घरच्यांनी जरीपटका पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत खंडणी प्रकरणात तिवारी दाम्पत्याला अटक केली आहे.
ज्या नातेवाईकांना आपलं समजून महिलेने आपली अडचण त्यांना सांगितली, त्याच नातेवाईकांनी महिलेच्या अडचणींचा गैर फायदा घेत तिची फसवणूक केली. मात्र वेळीच महिलेने घरच्यांना विश्वासात घेऊन सर्व प्रकार सांगितल्याने वेळीच त्यांना रोखणे शक्य झाले.