नागपूर : नागपुरातील कुख्यात गॅंगस्टर आबू खानला (वय 51 )अटक करण्यात आली. नागपूर पोलिसांनी ( Nagpur Police) भंडारा येथून आबू खानच्या मुसक्या आवळल्या. आबू खान हा मकोकाचा (MaCOCA) आरोपी आहे. तो मागील वर्षीपासून फरार होता. त्याच्यावर नागपुरात अनेक गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसांपासून आबू खान पोलिसांना चकमा देत होता. राज्यातील वेगवेगळ्या शहरात फिरत होता. आबू खान हा कधी कारागृहात तर कधी कारागृहाबाहेर असतो. आबूने आपले गुन्हेगारी नेटवर्क (Crime Network) सक्रिय केले होते. खंडणीचे गुन्हे त्याच्याविरोधात दाखल आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिघोरी येथील एक बारमध्ये जाऊन त्याने खंडणी मागितली होती. बार चालवायचा असेल, तर नियमित हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली होती. बारमध्ये काम करणाऱ्यांना तलवारीचा धाक दाखविला होता. आबू आणि टोळीची ताजबाग, सक्करदरा परिसरात मोठी दशहत आहे. त्यामुळं त्याच्याविरोधात तक्रार करण्याची हिंमत सहसा कोणी करत नाहीत.
आबू खानविरोधात तीन वर्षांपूर्वी नागपूर शहर पोलिसांनी कारवाई केली. त्याचे अमली पदार्थांचे नेटवर्क मोडून काढले होते. दीड ते दोन वर्षे कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर आला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला. दिघोरीत बारमालकाकडून खंडणी वसूल करण्याचा आबू खानने प्रयत्न केला. तलवारी दाखवून बारच्या कर्मचाऱ्यांना धमकावले होते. तेव्हापासून तो फरार होता. पोलिसांना चकमा देत होता. या शहरातून त्या शहरात फिरत होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या तो निशाण्यावर होता. अखेर भंडारा येथे आबू खानला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
नागपूर पोलीस हे आबू खानच्या मागावर होते. कारण जामिनावर आल्यानंतर पुन्हा त्याने दहशत माजवली होती. शाहजादा खान व अमजद खान या आबूच्या भावांना 15 मार्चला अटक करण्यात आली. आबू आणि त्याच्या भावांनी ताजबाग परिसरात काही लोकांची जमीन हडपल्याचा आरोप आहे. त्यामुळं पोलीस आयुक्तांनी मकोका अंतर्गत खान बंधूंवर करडी नजर ठेवली होती. त्यानंतर हे फरार झाले होते. शाहजादा खान व अमजद खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घराची तपासणी पोलिसांनी केली. मकोका कारवाई केली असल्यानं त्यांना आता सर्व संपत्तीचा हिशोब द्यावा लागणार आहे. या काही गडबड आढळली तर पोलीस त्यांची संपत्ती जप्त करू शकते.