…तर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, खबरदारीसाठी नागपुरातील 850 सराफांना नोटीस
भारतीय मानक ब्युरोनं नागपुरातील 850 सराफा व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून जुन्या हॉलमार्किंग दागिन्यांची माहिती मागवली आहे.
![...तर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, खबरदारीसाठी नागपुरातील 850 सराफांना नोटीस ...तर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, खबरदारीसाठी नागपुरातील 850 सराफांना नोटीस](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/07/09011040/gold24.jpg?w=1280)
नागपूर : भारतीय मानक ब्युरोनं नागपुरातील 850 सराफा व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून जुन्या हॉलमार्किंग दागिन्यांची माहिती मागवली आहे. सराफ व्यापाऱ्यांनी 15 दिवसात माहिती न दिल्यास आणि त्यांच्याजवळ जुन्या हॉलमार्कचे दागिने मिळाल्यास कारवाई केली जाणार आहे. नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांनी मात्र याचा निषेध व्यक्त केला असून माहिती देण्यास नकार दिला आहे.
…तर ग्राहकांची फसवणूक होऊ शकते
केंद्र सरकारने रेकॉर्ड नसलेले हॉलमार्किंग जारी केले आहे. त्यामुळे जुने आणि बनावट हॉलमार्कचे दागिने असल्यास ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता विभागाला आहे. ही बाब लक्षात घेता जुन्या दागिन्यांचा रेकॉर्ड पुन्हा तयार करण्यात येणार आहे. जर रेकॉर्ड योग्य असेल तर सराफ व्यापारी जुन्या हॉलमार्कचे दागिने विकू शकतात.
सराफ व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर
पूर्वी हॉलमार्किंगच्या दागिन्यांमध्ये चार मार्क लावण्यात येत होते. त्यात बीआयएसचा लोगो, कॅरेट शुद्धता, हॉलमार्किंग सेंटरचा कोड आणि ज्वेलरचा कोड असायचा. मात्र, आता या प्रक्रियेत बदल केला आहे. आता फक्त तीनच मार्क लावण्यात येत आहे. यात बीआयएसचा लोगो, कॅरेट शुद्धता आणि यूआयडी आधारित चिन्हाचा वापर करण्यात येत आहे. मात्र, सराफा व्यापाऱ्यांना मिळालेल्या नोटीसमुळे सरकारविरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहे. सरकारला स्टॉकची माहिती देणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
हॉलमार्किंगच्या नियमाविषयी संभ्रमाचे वातावरण
काही दिवसांपूर्वीच हॉलमार्किंगच्या नियमांबाबत पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा निर्णय लागू होऊनही भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) संकेतस्थळावरच याची पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्योग संघटनांनी केंद्रीय उपभोक्ता मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहले होते. 15 जूनला केंद्र सरकार आणि व्यापाऱ्यांची एक बैठक झाली होती. मात्र, त्यानंतरही भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या संकेतस्थळावर किंवा इंटरनेटवर सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून FAQ या बदलांची तितकीशी माहिती मिळत नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये हॉलमार्किंगच्या नियमाविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.
‘हॉलमार्किंगच्या दागिन्यांसाठी ग्राहकांना ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार’
केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क असलेल्याच सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाईल, हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ग्राहक अजूनही हॉलमार्क (Gold Hallmarking) असलेल्या दागिन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
केंद्र सरकारने नोटांबदी आणि जीएसटीप्रमाणेच या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नियम लागू होऊन 12 दिवस उलटल्यानंतरही नोंदणी प्रणालीत बरेच बदल बाकी आहेत. त्यामुळे आता Gold Hallmarking ची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबणीवर पडली आहे.
संबंधित बातम्या :
सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगच्या नियमाला केंद्र सरकार स्थगिती देणार?
BISच्या वेबसाईटवर हॉलमार्किंगची माहिती गायब; व्यापाऱ्यांनी ‘या’ केंद्रीय मंत्र्याला पाठवले पत्र
Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही