Nagpur Crime : बेपत्ता भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्याच, आठ दिवसापासून होत्या बेपत्ता
जबलपूरला गेलेल्या भाजप पदाधिकारी सना खान अचानक बेपत्ता झाल्या. आठ दिवस त्यांचा शोध घेतल्यानंतर धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
नागपूर / 9 ऑगस्ट 2023 : गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नागपूर पोलिसांनी या हत्याकांडाला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी जबलपूर येथील गुंड पप्पू साहू याच्या नोकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पप्पू साहू याच्या कारमधून रक्ताचे डाग धुवून काढल्याची माहिती नोकराने पोलीस चौकशीत दिली. पप्पू साहू अद्याप बेपत्ता असून, जबलपूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पप्पू साहू याच्यासोबत सनाचे लग्न झाले होते. लग्नानंतर सना खान यांचे साहूसोबत वाद झाले होते. यातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सना खान 1 ऑगस्टपासून होत्या बेपत्ता
पश्चिम नागपूरच्या महिला भाजपच्य नेत्या सना खान 1 ऑगस्टपासून नागपुरातून बेपत्ता झाल्या होत्या. जबलपुरला गेल्यानंतर दोन दिवसांनंतर सना यांच्याशी संपर्क होत नसल्याने सना खानच्या आईने पोलीस मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मानकापूर पोलीस त्यांचा सर्वत्र शोध घेत होते. सना खान यांना जबलपूर येथील एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचा शोध मध्य प्रदेशच्या जबलपूर शहराच्या दिशेने गेला. मानकापूर पोलिसांचे एक पथक जबलपूरकडे रवाना झाले.
दरम्यान जबलपूर येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची चर्चा पोलिसांच्या कानावर आली. पोलिसांनी याबाबत माहिती घेतली असता, यासंदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे नागपूर पोलिसांच्या हाती लागले. यानंतर हा मृतेदह सना खान यांचाच असल्याची पुष्टी झाली.