Buldana : हत्या झालेली ती तरुणी नेमकी कोण? 15 दिवसानंतरही प्रश्न अनुत्तरीत
सर्व शक्यता पडताळल्या, पण अजूनही त्या तरुणीबाबत गूढ कायम! आता बुलढाणा पोलीस काय करणार?
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एका तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पण 15 दिवसानंतरही या मृत तरुणीचा ओळख अद्याप पटू शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांसमोरची आव्हानं वाढली आहेत. तरुणीच्या मारेकऱ्यांचा अद्यापही थांगपत्ता लागू न शकल्यानं या तरुणीच्या मृत्यूचं गूढ आणि तिच्याशी संबंधिक अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या तरुणीची ओळख पटवण्यासाठी सर्व शक्यता पडताळून पोलिसांकडून तपास केला जातोय. मात्र तरिही पोलिसांना अद्याप या तरुणीची ओळख पटवण्यात यश आलेलं नाही.
काय नेमकी घटना?
बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खामगाव-मेहकर मार्गवरील एका पुलाच्या खाली तरुणीचा मृतदेह आढळून आली होती. पंधरा दिवसापूर्वी एक अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
हत्या करून कोणीतरी हा मृतदेह पुलाच्या खाली पाण्यात फेकला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्यापही या मृतदेहाची किंवा या तरुणीची ओळख पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांनाही आरोपीचा शोध घेणं आणखी आव्हानात्मक बनलंय.
सहा पथकं तैनात
तरुणीच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बुलढाणा पोलिसांची सहा पथके चौकशी करत आहेत. तरीही तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे आता पोलिसांकडूनही लोकांना आवाहन करण्यात आलं आहे. जर या मृतक तरूणीबद्दल काही माहिती असल्यास, पोलिसांना कळवावे, असं आवाहन हिवरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन वाघ यांनी केलं आहे.
पोलिसांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, या तरुणीचं वय 23 ते 35 वर्षांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या मुलीने पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केलेला होता. तर पायात पांढऱ्या रंगाच्या चपला होत्या. या मुलीचा रंग सावळा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. नंतर तिचा मृतदेह पुलाच्या खाली पाण्यात फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी अनेक शक्यता पडताळून बघितल्या असल्या तरी तरुणीची अद्याप ओळख पटलेली नसल्यानं या संपूर्ण प्रकाराचं गूढ आणखी वाढलंय.