नागपूर : नागपुरात शिवजयंतीनिमित्त रॅलीत तलवारी नाचवणं (Dancing with swords) महागात पडलं. पोलिसांनी ‘भाई’ लोकांना कायद्याचा हिसका दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अनेक तरुण हातात तलवारी घेऊन फिरताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी (Nagpur Police ) रॅलीचे आयोजन करणाऱ्या तरुणांसह नऊ तरुणांवर गुन्हे दाखल केलेत. त्याचबरोबर सहा तरुणांना अटकही करण्यात आलीय. १९ जानेवारीला हिंदवी समाज समुहाने रॅली काढली होती. नाचत गात ही रॅली जात होती. युवक उत्साहात होते. पण, यात त्यांना बाईकवर बसून तलवारी काढल्या. या तलवारी ते नाचवत होते.
नागपुरातील पारडी येथील रामभूमी सोसायटी ते मोमीनपुरा, गोळीबार चौक-वाड्यावर असलेल्या गांधी गेटजवळ रॅली संपली. या रॅलीत सुमारे ६०-७० दुचाकींचा सहभाग होता. रॅली मोमीनपुरामधून जाताच रॅलीत सहभागी अनेकांनी तलवारी काढून नाचवायला सुरुवात केली. डिजेच्या गाडीत बसलेल्या अर्पण गोपलेने त्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
रॅलीतील तरुण तलवारी फिरवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच चौकशीची सुत्रे हलवली. या रॅलीत अनिकेत पंचबुद्धे, आशिष अंबुले, आदित्य सिंगनजुडे, राकेश साहू, कुंदन तायडे, रजत अंबोली, योगेंद्र बागडे, अर्पण गोळपे, सुमित तांबे यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी वरील आरोपींना ताब्यात घेतले. कुंदन तायडे, रजत अंबोली, योगेंद्र बागडे आणि अर्पण गोळपे यांनी तलवारी फिरवल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
अशा मिरवणुकीमध्ये काय चाललं याची माहिती पोलिसांना असणे आवश्यक होते. पण, त्यांना ती माहिती लगेच का मिळू शकली नाही. याचा अर्थ पोलिसांचा अशा घटनांकडे लक्ष नसते का. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली. सार्वजनिक कार्यक्रमात शस्त्र घेऊन फिरल्यास कडक कारवाईच्या सूचना आता पोलिसांना देण्यात आल्या आहेत.