नागपूर : जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या सोळा वर्षे मुलीची हत्या केली. ही घटना नागपुरात उघडकीस आली. मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला. स्वतःच सुसाईड नोट सुद्धा मुलीच्या नावाने लिहून ठेवण्यात आले. मात्र पोलीस तपासात ही घटना उघड झाली. पोलिसांनी आरोपी त्याला बेड्या ठोकल्या. गुड्डू रज्जक नावाच्या एका पित्यानेच हे कृत्य केलं. आपल्या दुसऱ्या पत्नीला फसवण्यासाठी स्वतःच्या मुलीच्या आत्महत्येचा बनाव करत मुलीची हत्या केली. दुर्दैवी घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. आरोपी पित्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. त्यात सोळा वर्षाची मुलगी ही मोठी आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यानं दुसर लग्न केलं. मात्र पत्नीसोबत न राहता वडिलांच्या घरीच जास्त राहत होती. तिला आणि तिच्या परिवाराला धडा शिकविण्यासाठी त्याने मुलीचा सहारा घेतला.
मुलीला आत्महत्या करण्याचा बनाव करायला सांगितलं. त्यासाठी त्याने छताला दोर बांधलं. गळफास मुलीच्या गळ्यात टाकला आणि फोटो काढले. फोटो काढतानाच त्याने खाली ठेवलेले स्टूल हाताने आणि पायाने सरकवला. मुलीचा फास लागून जीव गेला.
मात्र त्याने मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. पोलिसात तक्रारसुद्धा दिली. मात्र पोलिसांना यात संशय आला. त्यांनी तपास केला असता पित्यानेच मुलीची हत्या केल्याचं उघड झालं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली. अशी माहिती कळमना ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली.
आरोपी हा विकृत स्वभावाचा आहे. त्याने आपल्या स्वार्थासाठी मुलीचा जीव घेतला. याआधी सुद्धा अशाच प्रकारे या मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र आता तर त्याने मुलीच्या नावाने तिच्या पाच सुसाईड नोट लिहून ठेवल्या.
त्यात त्यानं त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने माझ्यावर बलात्कार केला. म्हणून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख मुलीला करायला लावल्याचंसुद्धा पोलिसांच्या समोर आलं. अशा विकृत आरोपीला फाशी व्हावी, अशी मागणी मृतक मुलीच्या नातेवाईकांनी केली.