लैंगिक छळाच्या तक्रारीची भीती, कुलगुरु चौधरी यांनी प्राध्यापकाचा पदभार काढला
विद्यापीठाने धवनकर यांना स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांच्याकडे असलेला जनसंपर्क अधिकारीपदाचा भार सुद्धा काढून घेण्यात आला.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांना लैंगिक छडाची तक्रार असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या जनसंपर्क विभागाच्या साहाय्यक प्राध्यापकाचा जनसंपर्क अधिकारी पदाचा पदभार काढण्यात आला. यासंदर्भात खुलासा मागितला असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी माध्यमांना सांगितले. तसेच ज्या सात प्राध्यापकांना कथित लैंगिक छळाची तक्रार असल्याची भीती दाखवली जात होती. तशी लैंगिक छळाची कुठलीही तक्रार आली नसल्याचे कुलगुरू चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांनी कुलगुरू यांच्याकडे जनसंपर्क विभागाचे साहाय्यक प्राध्यापक आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी धर्मेश धवनकर विरोधात तक्रार केली होती. त्यांनी विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेला सात पीडित प्राध्यापकाना सावज केलेत.
त्या सातही प्राध्यापकांना तुमच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार आली. मी त्या समितीचा सदस्य आहे, असे सांगत भीती दाखवली. ते प्रकरण मिटवण्यासाठी पैसे द्या मी प्रकरण मिटवून देतो असे सांगत 16 लाख रुपये उकळल्याचे तक्रारीत सात पीडित प्राध्यापकांनी म्हंटले आहे.
या प्रकरणी आता विद्यापीठाने धवनकर यांना स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांच्याकडे असलेला जनसंपर्क अधिकारीपदाचा भार सुद्धा काढून घेण्यात आला. स्पष्टीकरण आल्यानंतर चौकशी समितीसुद्धा स्थापन करण्यात येणार आहे. दोषी असलेल्यांवर कारवाई होईल.
महत्वाचं म्हणजे या सात प्राध्यापकांविरोधात कुठलीही तक्रार नाही. मात्र प्रकरण गंभीर असल्याने ते जाणून घेणं सुद्धा महत्वाचं असल्याचं कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी म्हंटलं.
विद्यापीठात या आधी सुद्धा लैंगिक छड प्रकरण पुढे आलं होतं. त्यानंतर आता हे प्रकरण आल्याने विद्यापीठाची बदनामी होत आहे. त्यामुळे प्रकरण नेमकं काय हे उघड होण्याची गरज आहे.