नागपूर : नागपूरच्या संत जगनाडे महाराज हाउसिंग क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. शाखाप्रमुख आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून ठेवीदारांची 3 कोटी 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तहसिल पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकूण चार आरोपी आहेत. यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. या आरोपींमध्ये पतसंस्थेत काम करणाऱ्या रोखपाल, शाखा मॅनेजर आणि काही क्लार्कचा समावेश आहे.
संत जगनाडे महाराज हाउसिंग क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सन 2001 ते2021 या कालावधीत 70 ते 90 च्या वर ठेवीदारांच्या ठेवींवर बनावट सर्टिफिकेट तयार करून अवैधपणे कर्ज उचलण्यात आले. यासोबतच पतसंस्थेमध्ये जमा असलेल्या ठेवीवरील या आरोपींनी संगनमत करून अवैधपणे कर्ज उचलले.
सरकारच्या वतीने आलेल्या ऑडिटरच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आणि शाखा व्यवस्थापकांनी ठेवींवर अवैध कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी तहसिल पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक केली तर यातील एकाचा मृत्यू झाला.
नागरिकांनी आपली मेहनतीची कमाई मोठ्या विश्वसाने बँकेत ठेवली. मात्र बँकमधील कर्मचाऱ्यांनीच हा घोटाळा केल्याने याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार का हा प्रश्न आहे.