Gondia : रस्त्यावरुन चालताना कारची धडक! एक्सटेन्शन ऑफिसर जागीच ठार
ओव्हरटेक करताना चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून घडला थरारक अपघात!
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेसमोर रिंग रोडवर पायी चालणाऱ्या व्यक्तीला कारने मागून जोरदार धडक दिली. ज्या व्यक्तीला ही धडक बसली ती व्यक्ती एक्सटेन्शन अधिकारी म्हणून कार्यरत होती. शशिकांत खोब्रागडे असं या व्यक्तीचं नाव असून त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते आहे. शशिकांत खोब्रागडे हे दररोज जिल्हा परिषद समोरील रिंग रोड वर पायी फिरायला जात असत. नेहमीप्रमाणे ते पायी फिरायला गेले असता भरधाव कारने त्याचा जीव घेतला.
शशिकांत खोब्रागडे यांना धडक दिल्यानंतर ही कार रिंगरोडच्या बाजूला मैदानामध्ये जाऊन कोसळली. या अपघातात कार चालक गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिसांनी केली असून पुढील तपास करत आहेत. हा अपघात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरटेकिंगच्या नादात हा अपघात घडला. एका टिप्परला कार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. त्या वेळी कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि भीषण दुर्घटना घडली. गोंदिया बालाघाट बायपास मार्गावरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर हा अपघात घडला.
विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असणारे गुरुवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे चालण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते शिवनगर, सैनिक चौक, फुलचूर इथं राहायला होते. या भीषण अपघातात कार मागून आली आणि त्यांना चिरडून पुढे गेली. या दुर्दैवी घटनेत ते जागीच ठार झाले.
हा अपघात इतका जबर होता की भरधाव कार चार वेळा पलटी झाल्याचंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या अपघातातील कार चालकाला 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णलयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघाताची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घेतली असून पुढील तपास केला जातोय. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी बचावकार्य केलं आहे. वेगाच्या हव्यासापोटी एका निष्पाप पादचाऱ्याचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केला जातोय.