तो दुचाकीने जात होता, ते अल्टोने आले; तलवार, चाकूने भोसकले, नागपुरात नेमकं काय घडलं?
राजेश रक्तबंबाळ होऊन जीव वाचवण्यासाठी पळत सुटला. मात्र आरोपींच्या हातातून तो सुटू शकला नाही.
नागपूर : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात भर रस्त्यावर झालेल्या हत्येच्या घटनेचा थरार पाहायला मिळाला. पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत राजेश मेश्राम नावाच्या युवकाची अल्टो कारमधून आलेल्या अज्ञात तीन आरोपींनी तलवार आणि चाकूने भोसकून हत्या केली. पोलीस आता घटनेचा तपास करत आहेत. मात्र या घटनेने नागपूर चांगलाच हादरला आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील कमाल चौक परिसरात सकाळी दहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. भर दिवसा, भर रस्त्यावर हत्येचा थरार पाहायला मिळाला.
मृतक राजेश मेश्राम हा आपल्या दुचाकीवरून कमाल चौक परिसरातील रोडवर एका पान टपरीजवळ थांबला होता. त्या ठिकाणी तो काही खरेदी करत असताना विरुद्ध दिशेने एक अल्टो कार आली. त्या कारमधून तीन जण उतरले. त्यांच्या हातात तलवार आणि चाकू होते. कुणाला काही कळण्याच्या आधीच त्यांनी राजेशवर सपासप वार करायला सुरुवात केली.
राजेश रक्तबंबाळ होऊन जीव वाचवण्यासाठी पळत सुटला. मात्र आरोपींच्या हातातून तो सुटू शकला नाही. त्यांनी आणखी वार करत त्याची हत्या केली. तो जागीच मृत झाला आणि घटनास्थळावरून लगेच आरोपींनी पळ काढला. हत्तेचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र जुन्या वादातून हत्या झाली असावी अशी शंका पोलीस व्यक्त करत आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. अशी माहिती पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय भेंडे यांनी दिली.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भर रस्त्यामध्ये हत्येचा थरार घडला. अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसून येत आहेत. पोलीस घटनेचा तपास करतील. आरोपींना पकडतील. पण, भर दिवसा, भर रस्त्यात झालेल्या या घटनेमुळे परिसर चांगलाच हादरला आहे.