Nagpur Kidnapping : नागपूरमध्ये पैशाच्या जुन्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण, पोलिसांकडून सुखरुप सुटका; दोन आरोपी अटक
काहीतरी जुन्या पैशाच्या वादातून हे अपहरण झालं असल्याचं पुढे येत आहे. मात्र पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
नागपूर : क्राईम ब्रांच पोलीस असल्याची बतावणी करत सीताबर्डी मार्केटमधून एका व्यापाऱ्याचं अपहरण (Kidnapping) करुन त्याला सांगलीत नेल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. भूषण तन्ना असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्या (Businessman)चे नाव आहे. सांगलीत पोहचताच अपहरणकर्त्यांनी व्यापाऱ्याच्या पत्नीकडे पैशाची मागणी केली. मात्र व्यापाऱ्याच्या नागपूर पोलिसांकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. यामुळे आरोपींचा डाव फसला. नागपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आपली दोन पथके व्यापाऱ्याच्या सुटकेसाठी रवाना केली. व्यापाऱ्याची सुखरुप सुटका (Rescued) करत अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.
पत्नीला कॉल करुन 39 लाखाची केली मागणी
नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये अन्नधान्याचे व्यापारी भूषण तन्ना आपल्या पत्नीसह आले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ दोन इसम आले. त्यांनी आम्ही क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगितलं आणि चौकशीसाठी म्हणून त्या व्यापाऱ्याला घेऊन गेले. बराच वेळ झाला तरी व्यापारी आला नसल्याने पत्नीने सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. मात्र काही वेळातच व्यापाऱ्याच्या पत्नीला अपहरण करणाऱ्यांचा फोन आला. फोनवर आरोपींनी तुझ्या पतीकडे आमचे 39 लाख रुपये आहेत ते सांगलीला आणून दे आणि पतीला घेऊन जा, असे सांगितले.
जुन्या पैशाच्या वादातून अपहरण झाल्याचे निष्पन्न
घाबरलेल्या पत्नीने तक्रार देताच पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत सांगलीकडे पथक रवाना केले. सांगलीच्या स्थानिक पोलिसांची सुद्धा यात मदत घेण्यात आली. नागपूरचे पथक त्या ठिकाणी पोहोचतात दोन्ही अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता काहीतरी जुन्या पैशाच्या वादातून हे अपहरण झालं असल्याचं पुढे येत आहे. मात्र पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. सीताबर्डी सारख्या गजबजलेल्या मार्केट परिसरातून हे अपहरण झाल्याने घबराटीचे वातावरण आहे. (Kidnapping of businessman in Nagpur, safe release by police; Two accused arrested)