घरात खेळता खेळता गळफास बसला, बुलडाण्यात बारा वर्षीय मुलाचा मृत्यू
बाहेर खेळायला जातो असे म्हणून तो घराच्या मागे गेला होता. तिथे असलेल्या लोखंडी पाईपला त्याने रुमाल बांधला आणि त्याच्यासोबत तो खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याला फास लागला.
बुलडाणा : घरात खेळता खेळता अचानक गळफास बसल्याने बालकाला प्राण (Child Death) गमवावे लागले. बारा वर्षीय मुलाचा अपघाताने मृत्यू (Accidental Death) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरातील मीरा नगर भागात (Buldana Crime News) हा प्रकार घडला. काल (मंगळवारी) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पूर्वेश वंदेश आवटे असं या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार पूर्वेश त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पूर्वेशचे वडील खासगी कंपनीत काम करतात, तर फावल्या वेळात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दोन वर्षांपूर्वी पूर्वेशच्या बहिणीचाही मृत्यू झालेला आहे.
नेमकं काय घडलं?
काल पूर्वेशचे वडील कंपनीत कामाला गेलेले होते, तर तो आणि त्याची आई हे दोघेच घरी होते. त्यावेळी बाहेर खेळायला जातो असे म्हणून तो घराच्या मागे गेला होता. तिथे असलेल्या लोखंडी पाईपला त्याने रुमाल बांधला आणि त्याच्यासोबत तो खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याला फास लागला.
डॉक्टरांकडून मृत घोषित
ही बाब त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आईने त्याला खाली उतरवले. त्याच्या वडिलांना बोलावल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून पूर्वेशला मृत घोषित केले.
साहसी व्हिडीओंचं अनुकरण जीवावर?
पूर्वेशला मोबाईलवर युट्यूबवर गेम खेळण्याची आवड होती. त्यामध्ये साहसी व्हिडीओ पाहून तसेच काहीतरी करण्याचा त्याचा सततचा प्रयत्न असायचा. कदाचित या छंदामुळेच त्याला गळफास लागला असावा अशी चर्चा शहरात आहे.