अमरावती : अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्या अंतर्गत मारडा गावात मध्यरात्री एका घरात पाच ते सहा जणांनी दरोडा टाकला, चाकूच्या धाकावर 14 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मागचा दरवाजा तोडून प्रवेश
मारडा येथे निलेश रमेश साव यांचं घर आहे. रात्री घरातील सर्व जण झोपले असताना अज्ञात पाच ते सहा जणांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोकांना तुम्ही झोपून रहा, अशा सूचना चोरटे हिंदी भाषेत करत होते.
कुटुंबाला चाकूचा धाक दाखवत लूट
घरातील सदस्यांच्या मानेला आणि पोटाला चाकू लावत जीवे ठार मारण्याची धमकी चोरट्यांनी दिली. त्यांनी कपाटामध्ये असलेले सोने, चांदी आणि साडेतीन हजार रुपयांची रोख रक्कम असा 13 लाख 89 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला.
अर्ध्या तासाचा थरार, घरातील ऐवज धुऊन नेला
काही चोरटे घरात, तर काही जण बाहेर लक्ष ठेवून होते. जवळपास अर्धा तास घरात चोरट्यांचा थरार सुरु होता. घरातील सर्व सोने, चांदी आणि रक्कम लुटून सर्व आरोपी पसार झाले. त्यानंतर लगेच कुऱ्हा पोलिसांना फोनवरुन माहिती देण्यात आली. यावेळी कुऱ्हा पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे पोलीस ताफ्यासह हजर झाले
जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हे सुद्धा रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेगाने रात्रीच तपासाची चक्रे फिरवली, मात्र चोरटे सापडले नाहीत. घरी श्वान पथक आणि ठसे तज्ञ दाखल झाले होते, पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीच्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचा मुलगा बेटिंगमध्ये अडकला, उल्हासनगरात बेड्या
बलात्काराच्या आरोपातील 25 वर्षीय आरोपी पळाला, वैद्यकीय तपासणीवेळी हातावर तुरी