भंडारा : मुलाच्या लग्नाच्या जुना वाद उकरुन काढून भावाने बहिणीवर चाकू हल्ला (Knife Attack) त्याने स्वतः विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. भंडारा जिल्ह्यातील (Bhandara Crime News) मांढळ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. दोघांवर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी बहीन मैना चंडीमेश्राम यांच्या मुलांच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आरोपीच्या मुलाला सांभाळ त्याच्या बहिणीने केला होता. त्यानंतर त्याचं लग्न परस्पर लावून दिल्याचा राग मनात धरत भावाने माहेरी आलेल्या बहिणीवर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कारवाईच्या भीतीने त्याने स्वतःही विषप्राशन करुन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
वास्तू पूजन सोहळ्यासाठी माहेरी आलेल्या बहिणीसोबत मुलाच्या लग्नावरुन भावाचा वाद झाला. वादात भावाने बहिणीवर चाकू हल्ला करुन तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर स्वतः भावानेही विष प्यायले. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे घडली आहे.
दरम्यान दोघा बहीण-भावावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मैना दादाजी चंडीमेश्राम (वय 60 वर्ष, रा. जुनोना, ता. पवनी) असे जखमी बहिणीचे नाव असून गोविंदा अर्जुन कांबळे (वय 55 वर्ष, रा. मांढळ) असे विष पिणाऱ्या भावाचे नाव आहे.
गोविंदाचा मुलगा महेश हा 14 वर्षांपासून आत्या मैनाकडे राहतौ. मैनाने भाचा महेशचे लग्न करुन त्याला घरही बांधून दिले. मात्र, हे सर्व करतांना बहिणीने आपल्याला विश्वासात घेतले नाही, याचा राग भाऊ गोविंदाच्या मनात होता.
दरम्यान वास्तू पूजन कार्यक्रमासाठी मैना मांढळ येथे आली असता त्यावेळी गोविंदा आणि त्याच्या पत्नीने वाद उकरून काढला. यावेळी बहिणीने हटकले असता, भावाने चक्क बहिणीच्या पाठीवर चाकूने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची लाखांदूर पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यामुळे आता आपल्यावर कारवाई होईल या भीतीने भाऊ गोविंदानेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने विष घेतल्याचे माहीत होताच कुटुंबीयांनी गोविंदाला तात्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पुढील उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता दोन्ही भावा- बहिणीवर एकाच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पुढील तपास लाखांदूर पोलिस करत आहेत