अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधमांची फाशीची शिक्षा रद्द, नागपूर खंडपीठाकडून मरेपर्यंत जन्मठेप
सागर विश्वनाथ बोरकर आणि निखिल शिवाजी गोलाईन अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस स्टेशन हद्दीत दोन वर्षांपूर्वी ही बलात्काराची घटना घडली होती.
नागपूर : नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरवली आहे. फाशीऐवजी आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी या आरोपींना बुलडाणा सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा नागपूर खंडपीठाने कमी केली.
काय आहे प्रकरण?
सागर विश्वनाथ बोरकर आणि निखिल शिवाजी गोलाईन अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस स्टेशन हद्दीत दोन वर्षांपूर्वी ही बलात्काराची घटना घडली होती.
नेमकं काय घडलं?
26 एप्रिल 2019 रोजी रात्री 10 वाजता पीडित मुलगी तिच्या कुटुंबीयांसह घरी झोपली होती. त्यावेळी आरोपींनी मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.
फाशीची शिक्षा रद्द करुन जन्मठेप
या प्रकरणात बुलडाणा सत्र न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही शिक्षा रद्द ठरवली. त्याऐवजी आता या आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
दरम्यान, वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 33 वर्षीय मिलिंद पांडुरंग राऊत (रा. साबळे लेआऊट, वर्धा) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. छतावर उभी राहून मोबाईलमध्ये गाणे ऐकत असलेली तरुणी एकटी असल्याचे हेरुन आरोपी मिलिंद राऊतने तिचा विनयभंग केला होता.
उस्मानाबादेत छेड काढणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी
उस्मानाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्या प्रकरणी आरोपीला सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सत्र न्यायाधीश एन. एच. मखरे यांनी यासंदर्भात निकाल दिला. शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीची सलमान चांद पठाण (वय 19 वर्ष ) हा तरुण 2018 मध्ये वारंवार छेड काढत होता. घरातून कॉलेजला जाता-येताना तिला रस्त्यात अडवून, तसेच मागे लागून तो तिची छेड काढत असल्याचा आरोप आहे. उस्मानाबाद कोर्टाने तरुणाला शिक्षा ठोठावल्याची माहिती सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, अहमदनगरमध्ये तरुणावर गुन्हा
अकरावीतील विद्यार्थिनीची छेड, उस्मानाबादेत 19 वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरी
टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वर्ध्यात तरुणाला सश्रम कारावासाची शिक्षा