नागपूर : रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा काळाबाजार (Remdesivir Injection Black Market) करणाऱ्या दोघा जणांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शुभम अर्जुनवार, ज्योती उर्फ जिया उत्तमसिंग अजित असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावं आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काळाबाजार करताना दोघांना अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे ब्लॅकमार्केट केल्याचा आरोप झाला होता. हा प्रकार 18 एप्रिल 2012 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वाथोडा परिसरात घडला होता. 25 हजार रुपयांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकत असताना त्यांच्याकडून 5 इंजेक्शन जप्त करण्यात आली होती. आजपर्यंत रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात ही तिसरी केस असून चार आरोपींना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नागपुरात वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
याआधी, नागपुरातील वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. एप्रिल 2021 मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाचे रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरून विकल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. महेंद्र रतनलाल रंगारी असे 28 वर्षीय वॉर्डबॉयचे नाव आहे. तो नागपूरच्या रंगारी चौकातील एका कोव्हिड सेंटरमध्ये कामाला होता. महेंद्र रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करत होता. 17 एप्रिल 2021 रोजी हुडकेश्वर पोलिसांनी महेंद्रवर गुन्हा नोंदवला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याचे आदेश दिले होते. याचा तपास तीन महिन्यांत पूर्ण होऊन निकाल लागला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांच्या समक्ष सुनावणी झाली होती.
कसा लागला होता शोध
महेंद्र काम करत असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये संबंधित कोरोनाग्रस्त महिलाही दाखल होती. तिला रेमडेसिव्हीरची आवश्यकता असल्याने कुटुंबीयांनी इंजेक्शनची व्यवस्था केली होती. 17 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळच्या सुमारास महिला स्वच्छतागृहातून परत आली, तेव्हा तिला टेबलवर ठेवलेले इंजेक्शन गायब दिसले. महिलेले लगेचच कोव्हिड सेंटरच्या प्रमुखाकडे तक्रार केली. या प्रकरणी पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता वॉर्डबॉय महेंद्र रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरुन नेताना दिसला होता.
गोंदियातील आरोपींची निर्दोष सुटका
दुसरीकडे, रेमडेसिव्हीर काळा बाजार प्रकरणात सहा आरोपींची जिल्हा आणि सत्र न्यायालय गोंदियाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. भट्टाचार्य यांनी निर्दोष मुक्तता केली होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलिसांनी सापळा रचून सहा जणांनी अटक केली होती.
संबंधित बातम्या :
रेमडेसिव्हीर काळा बाजार, सापळा रचून पकडलेल्या सहा आरोपींची निर्दोष मुक्तता
रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात महाराष्ट्रात पहिलीच शिक्षा, वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावास