स्मार्ट सिटी अंतर्गत नागपुरात लावलेल्या CCTV च्या बॅटऱ्याही चोरीला, पाच जणांची टोळी जेरबंद
नागपूर शहरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटरी चोरणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला असून नितीन साहू, मुकेश साहू, प्रकाश राठोड राजकुमार आणि संतोष साहू अशी आरोपींची नावे आहेत
नागपूर : नागपूर शहरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत चौकाचौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटरी चोरी करणारी टोळी सक्करदरा पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी या टोळीच्या पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून 3.60 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या कामात अडथळा आणणारी चोरी
नागपूर शहरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटरी चोरणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला असून नितीन साहू, मुकेश साहू, प्रकाश राठोड राजकुमार आणि संतोष साहू अशी आरोपींची नावे आहेत. नागपूर शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या बॅटरी काही दिवसांपासून चोरीला जात होत्या. यामुळे पोलिसांच्या कामात अडथळा येत होता.
कोण आहेत आरोपी
अनेक प्रमुख चौकात या घटना घडल्यामुळे पोलीस चिंतेत होते, नितीन मुकेश संतोष आणि राजकुमार भंगार व्यावसायिक आहेत. राजकुमारचा कळमण्यात कारखाना आहे. तिथे नितीन मुकेश आणि संतोष चोरी केलेल्या बॅटरी विकत होते. बॅटरी वितळवून शिसे काढण्यात येत होते.
काय होती मोडस ऑपरेंडी
आरोपी पहाटे तीन ते पाच वाजताच्या दरम्यान ऑटो किंवा बाईकने बॅटरी चोरी करण्यासाठी निघत होते. सीसीटीव्ही कॅमेरा पासून बचाव करण्यासाठी ते वस्तीतून जात आणि येत होते. पहाटे पोलिसांची गस्त कमी असते यामुळे आरोपी सहज बॅटरी चोरून फरार होत होते. आरोपींकडून 62 बॅटरीचे बॉक्स 176 किलो शिसे आणि वाहनासह 3.60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शहरात 3 हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, मात्र चोरट्यांनी शहराच्या या तिसऱ्या डोळ्यावरच नजर टाकली. परंतु चोरट्यांच्या गॅंगचं हे कृत्य पुढे आलं आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली.
इंदापुरात आवळा देऊन कोहळा काढला
“आवळा देऊन कोहळा काढणे” या म्हणीचा प्रत्यय नुकताच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पहावयास मिळाला आहे. पैसे लुटण्याच्या इराद्याने चोरट्यांनी नामी शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे. चोरट्यांनी चक्क रस्त्यावर दोन-चार नोटा फेकल्या होत्या. रस्त्यावर पडलेल्या या नोट उचलण्याच्या मोहापायी जे बाईकस्वार उतरायचे, त्यांच्या दुचाकीवरील ऐवज लुटून पसार होण्याचा त्यांचा प्लॅन होता. या योजनेनुसारच बाईकवरुन खाली उतरलेल्या एका दुचाकीस्वाराचे 2 लाख 33 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना गुरुवारी दुपारी इंदापूर शहरात घडली आहे.
अभिनेत्रीच्या घरात घुसून लूट
दरम्यान, मॉडेल-अभिनेत्री अलंकृता सहायला (Alankrita Sahai) घरात ओलीस ठेवून चाकूच्या धाकाने तिची लूट केल्याची घटना दिल्लीत उघडकीस आली होती. सेक्टर -27 मधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. दुपारी तीन अज्ञात मुखवटेधारी चोरांनी तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर अलंकृताला ओलीस ठेवून चाकूच्या धाकाने 6.50 लाख रुपये लुटण्यात आल्याचा आरोप आहे. भीतीने तिने स्वतःला वॉशरूममध्ये बंद केले होते.
संबंधित बातम्या :
वाईन शॉप मॅनेजरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दहा लाखांची लूट, दुकानातील कर्मचाऱ्यालाच बेड्या
VIDEO | रस्त्यावर दोन-चार नोटा फेकल्या, बाईकस्वार आमिषाला भुलताच त्याचे सव्वादोन लाख उडवले
बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरात दरोडा, ओलीस ठेवून साडेसहा लाखांची लूट