वाळूचोरी करताना ट्रॉली उलटून दोघांचा मृत्यू, वर्ध्यात नगरसेवकाला अटक
देवळी येथील नगरसेवक गौतम पोपटकर यांनी गेल्या दीड वर्षापासून सोनेगाव (बाई) शिवारातील नदी-नाल्यातून अवैधरीत्या वाळू चोरी सुरु केली होती. याच दरम्यान गेल्या सोमवारी सकाळी अडेगाव येथे वाळू आणण्यासाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला.
वर्धा : वाळू चोरी करताना ट्रॉली उलटून दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी ट्रॅक्टर मालक, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या सोमवारी सकाळी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात झाला होता.
काय आहे प्रकरण?
वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळू चोरी करुन वाहतूक करत असताना अडेगाव येथे ट्रॉली उलटली होती. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी ट्रॅक्टर मालक, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांच्यावर कारवाई करुन अटक करावी, तसेच मृतांच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मृताच्या परिवाराने पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणी नगरसेवक गौतम पोपटकर यांना अटक केली.
गौतम पोपटकरांवर वाळूचोरीचा आरोप
देवळी येथील नगरसेवक गौतम पोपटकर यांनी गेल्या दीड वर्षापासून सोनेगाव (बाई) शिवारातील नदी-नाल्यातून अवैधरीत्या वाळू चोरी सुरु केली होती. याच दरम्यान गेल्या सोमवारी सकाळी अडेगाव येथे वाळू आणण्यासाठी जाणाऱ्या एमएच 32 एएच 8709 क्रमांकाच्या ट्रॅक्टरला अपघात झाला.
यामध्ये अनिल सुरेश लाकडे (33) आणि ऋतिक दिनेश वानखेडे (24) हे दोन मजूर ठार झाले, तर पाच मजूर गंभीररीत्या जखमी झाले. या प्रकरणी देवळी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक शंकर भानारकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
ट्रॅक्टरचा विमा नाही, ट्रॉलीची कागदपत्रं संशयास्पद
ट्रॅक्टर मालक गौतम पोपटकर यांचा वाळू चोरीचा व्यवसाय असून घटनेच्या दिवशी त्यांच्या सांगण्यावरुनच आमच्या घरातील व्यक्ती ट्रॅक्टरवर कामाला गेली होती, असे मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. या सोबतच ट्रॅक्टरचा विमा नसल्याने आणि अपघातग्रस्त ट्रॉलीचे कागदपत्र संशयित असल्याने या प्रकरणी ट्रॅक्टर मालकावर कारवाई करण्याची मागणी पहिल्या दिवशीपासूनच सुरु होती; परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मृतांच्या परिवारासह लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकारी देवळी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले.
यावेळी पोलिसांच्या कारवाई विरुद्ध संताप व्यक्त करून पोपटकर यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. अखेर नागरिकांचा रोष बघून पोलिसांनी नगरसेवक पोपटकर यांना अटक केली. पोलिसांनी ट्रॅक्टर मालक आणि चालक यांच्याविरुद्ध भादंवि 279, 337, 304-अ तसेच सहकलम 184, 146/196 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्या. वाहनाचा विमा तसेच कागदपत्राची शहानिशा करून या गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.
संबंधित बातम्या :
वाळू चोरी करताना ट्रॉली उलटली, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर
शेतातून परतणाऱ्या बाईकस्वार बापलेकावर काळाचा घाला, कारच्या धडकेत दोघांचाही मृत्यू