वर्धा : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड (Wardha Hinganghat) प्रकरणी प्रा. अंकिता पिसुड्डे हिला जिवंत जाळणारा विक्की उर्फ विकेश नगराळे (Vikki Nagrale) याला हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने काल (बुधवारी) हत्या प्रकरणात (Murder) दोषी ठरवले होते. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने विक्की नगराळेला आजीवन कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विक्कीने अंकिताला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते. या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला आजच (10 फेब्रुवारी) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तिच्या दुसऱ्या स्मृतिदिनी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हिॅगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अंकिताला जाऊन बरोबर दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे तिला खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मरेपर्यंत जन्मठेप होते. आज न्यायालयाने हे देखील सांगितलं आहे की आरोपी विकेशला 3 फेब्रुवारीला अटक झाली होती. तरी हा दोन वर्षाचा काळ त्या शिक्षेत गृहित धरला जाणार नाही. त्याला आजपासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगायची आहे. त्याचप्रमाणे 5 हजार रुपये दंडही त्याला द्यायचा आहे. निकालाची पूर्ण प्रत आम्हाला अजून मिळाली नाही. बचावपक्षाला हायकोर्टात जायचं असेल तर निकालाची प्रत वाचून आम्ही पुढील पाऊल उचलू. आम्ही फाशीची मागणी केली होती. मात्र हा अपवादात्मक गुन्हा नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निश्चितपणे अंकिताला न्याया मिळाला असं म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
अंकिता पिसुड्डे हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. अंकिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी होते.
अंकिता पिसुड्डे 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतून काढलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले होते.
गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत अंकिताला नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असताना आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला.
या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय 28 फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात 64 सुनावण्या घेत 29 साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले.
शासनाने लोक आग्रहापुढे झुकून सदर प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयामध्ये होईल असे घोषित केले. विशेष सरकारी वकील म्हणून शासनातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती याप्रकरणी करण्यात आली. त्यामुळे प्रकरणाची जलद चौकशी करण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम, अॅड. दीपक वैद्य यांनी भाग घेतला. बचाव पक्षातर्फे अॅड. भूपेंद्र सोने, शुभांगी कोसार, अवंती सोने आणि सुदीप मेश्राम यांनी सहकार्य केले.
संबंधित बातम्या :
हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विक्की नगराळेविरोधात 26 दिवसात 426 पानांचं आरोपपत्र दाखल
आरोपीला लोकांमध्ये सोडा, तरच मुलीच्या आत्म्याला शांती, हिंगणघाट पीडितेच्या वडिलांचा आकांत