बिट कॉईनमध्ये गुंतवणुकीसाठी सेमिनार घेणाऱ्या तरुणाची हत्या, वाशिममध्ये तिघे ताब्यात
मुख्य आरोपी निशिद वासनिक याच्याकडे Ether trade Asia च्या बिट कॉईनच्या व्यवसायात लोकांनी गुंतवणूक करावी, म्हणून मृत तरुण हा सेमिनार आयोजित करत होता. तसेच व्यवसायाचा हिशोबही ठेवत होता.
वाशिम : बंदुकीच्या गोळ्या झाडून वाशिममध्ये 32 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिघांचा शोध सुरु आहे. बिट कॉईनच्या व्यवसायात गुंतवणूक करावी, म्हणून मयत तरुण गुंतवणूकदारांसाठी सेमिनार आयोजित करत असे.
नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पांगरी कुटे गावाजवळच्या शेतात 12 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास हत्येची घटना उघडकीस आली होती. मालेगाव पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्रं फिरवत अवघ्या 12 तासांत मृतकाची ओळख पटवण्यात यश मिळवले होते.
तीन आरोपी ताब्यात
नागपूरमधील थ्री स्टार हाऊसिंग सोसायटी, साईबाबा नगर खरबी हनुमान नगर भागातील माधव यशवंत पवार गोळीबार प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक गठित करण्यात आले होते. अखेर गुरुवारी तीन आरोपींना नागपूर पोलीस आणि वाशिम पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर तिघा आरोपींचा शोध सुरु आहे.
हत्येचं नेमकं कारण काय
यातील मुख्य आरोपी निशिद वासनिक याच्याकडे Ether trade Asia च्या बिट कॉईनच्या व्यवसायात लोकांनी गुंतवणूक करावी, म्हणून मृत तरुण हा सेमिनार आयोजित करत होता. तसेच व्यवसायाचा हिशोबही ठेवत होता. व्यवसायाच्या बिटकॉईनच्या पैशांची हेरफेर आणि हव्या असलेल्या मोबाईलच्या वादातून आरोपींनी तरुणाचे नागपूर येथून घरातून अपहरण केले होते. त्यानंतर त्याला वाशिममध्ये रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी उतरवून मुख्य आरोपी निषेद वासनिक याने गोळ्या झाडून ठार मारले असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
कोणाकोणाला अटक
ताब्यात घेतलेले आरोपी विक्की उर्फ विकल्प विनोदराव मोहोड, आराधना नगर, खरबी, पोस्टे वाठोडा (मुख्य आरोपी), शुभम उर्फ लाला भीमरावजी कन्हारकार वय 22 वर्ष, रा. आराधना नगर, नागपूर, व्यकेश उर्फ टोनी मिसन भगत, वय 25 वर्ष रा. आराधना नगर, नागपूर आहेत. याशिवाय मुख्य आरोपीसह दोन आरोपींचा शोध सुरु आहे. त्यामध्ये निशिद महादेव वासनिक, (मुख्य आरोपी) रा. आराधना नगर, नागपूर, गज्जू उर्फ गजानन मुनगुने आणि एका अनोळखी महिलेचा समावेश आहे. ताब्यातील तीन आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी वाशिम पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करणार आहेत.
संबंधित बातम्या :
अनैतिक संबंधात अडथळा, आईकडून मुलाची हत्या
प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!
Chandrapur Crime | टीव्हीवर पाहून लहान भावाची हत्या, मृतदेह पुरला, पावसामुळे हत्येचं गुपित उलगडलं