शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची आत्महत्या, नागपुरातील राहत्या घरी गळफास
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात काश्मीर खोऱ्यात नायक भूषण सतई शहीद झाले होते. त्यानंतर व्यथित झालेले वीरपिता रमेश धोंडू सतई यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
नागपूर : शहीद भूषण सतई (Martyr Bhushan Satai) यांच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील राहत्या घरी रमेश धोंडू सतई यांनी जीवनयात्रा संपवली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीमध्ये काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानशी दोन हात करताना नायक भूषण सतई शहीद झाले होते. (Martyr Bhushan Satai’s Father Ramesh Dhondu Satai hangs self to commit Suicide in Nagpur)
राहत्या घरी गळफास
मुलाच्या हौतात्म्यानंतर वीरपिता रमेश धोंडू सतई यांना मोठा धक्का बसला होता. याच विवंचनेतून त्यांनी स्वतःच्या आयुष्याची अखेर करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं. रमेश सतई यांनी नागपूरमधील फैलपुरा काटोल भागातील राहत्या घरी गळफास घेतला. सतई यांच्या शव विच्छेदन अहवालात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे निश्चित झाले. सतई यांच्या पश्चात पत्नी सरिता सतई, लहान मुलगा लेखनदास सतई आणि मुलगी असा परिवार आहे.
कोण होते शहीद भूषण सतई?
शहीद भूषण सतई हे सहा मराठा बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होते. भारतीय सेनेमध्ये निवड झाल्यानंतर ते मराठा बटालियनमध्ये रुजू झाले होते. शहीद होण्याच्या वर्षभर आधीपासून त्यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीर येथे होती.
दिवाळीत भूषण सतई यांना वीरमरण
दिवाळीच्या दिवशी (13 नोव्हेंबर 2020) पाकिस्तानी सैन्याने भारतावर भ्याड हल्ला केला होता. पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय सैन्यावर गोळीबार केला होता. तसेच जम्मू-काश्मीरमधील सामान्य नागरिकांवरही गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र महाराष्ट्रातील भूषण सतई आणि ऋषिकेश जोंधळे या जवानांना वीरमरण आलं होतं.
संबंधित बातम्या :
पत्नी, मुलं, सासू, मेहुणीसह 5 जणांची हत्या करुन पतीची आत्महत्या! धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं
अखेरची भाऊबीज! शहीद ऋषिकेश जोंधळेंना बहिणीने ओवाळले, शोकाकुल वातावरणात निरोप
(Martyr Bhushan Satai’s Father Ramesh Dhondu Satai hangs self to commit Suicide in Nagpur)