Nagpur : उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची दयनीय अवस्था, गर्भवतींना जमिनीवर बसण्याची दुर्दैवी वेळ
सात ते आठ महिन्याच्या गर्भवती महिला उफचारासाठी नोंद करण्यासाठी एक ते दोन तास उभ्या असतात. रांगे उभं राहून थकून गेल्यानंतर बसायचं कुठे, असा प्रश्न महिलांना पडतो. पण बसण्यासाठी कोणतीही सोय दवाखान्यात नाही.
नागपूर : कोरोना महामारीनंतर (Corona Pandemic) सरकारी रुग्णालयं अधिक अद्ययावत करण्याची गरज आहे, अशी भावना सगळ्यांनीच व्यक्त केली. तसे प्रयत्न केले जातील, अशी आश्वासनं दिली गेली. पण खरंच ते झालं का? महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या नागपुरात (Nagpur Medical Collage and Government Hospital) धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिलांची परवड होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तासनतास गर्भवतींना उपचारासाठी रांगेत उभं राहावं लागतंय. दुर्दैव म्हणजे या रांगेत उभं राहून थकणाऱ्या महिलांना अक्षरशः जमिनीवर बसण्याशिवाय दुसरा कोणताच पर्यायही नाही. हे धगधगतं वास्तव सरकारी रुग्णालयांच्या (Maharashtra Government Hospital) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. हे दयनीय चित्र केव्हा बदलणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
तासनतास रांग, खुर्चीचा पत्ता नाही
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसलेल्या बाबींनी सरकारी रुग्णालयांच्या दुरावस्थेवर बोट ठेवलंय. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गर्भवती महिलांची उपचारासाठी मोठी रांग लागल्याचं दिसून आलंय. या वेळी रांगेतील काही महिला तशाच जमिनीवर बसलेल्याचं व्हिडीओत दिसलंय.
सात ते आठ महिन्याच्या गर्भवती महिला उपचारासाठी नोंद करण्यासाठी एक ते दोन तास उभ्या असतात. रांगेमध्ये उभं राहून थकून गेल्यानंतर बसायचं कुठे? असा प्रश्न महिलांना पडतो. पण बसण्यासाठी कोणतीही सोय दवाखान्यात नसल्यानं महिलांना जमिनीवर बसण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसल्याचं दिसून आलंय.
कुणी दखल घेणार आहे का?
मेडिकल प्रशासनाकडून गर्भवती महिलांना बसण्याचीही सोय करण्यात आलेली नाही. पुरेशी यंत्रणा नसल्याने गर्भवती महिलंच्या ओपीडीच्या वेळेस मोठी गर्दी होते. त्यामुळे उपरासाठी सरकारी दवाखान्यात येणाऱ्या गर्भवती महिलांची होणारी परवड कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. संतप्त गर्भवती महिलांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्यमंत्री काही दखल घेणार का? उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील शासकीय रुग्णालयातील हे चित्र बदलणार का? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जातोय.