Nagpur Thief Arrest : जेलमधून बाहेर येताच पुन्हा घरफोडी, कुख्यात आरोपीला नागपूर पोलिसांकडून अटक
नागपूरच्या सदर परिसरातील एक कुटुंब काही दिवसांसाठी पुण्याला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत त्यांच्या घरामध्ये आरोपी लकीने आणि त्याच्या साथीदाराने घरफोडी केली होती.
नागपूर : जेलमधून सुटून बाहेर येताच पुन्हा घरफोडी (Burglary) करणाऱ्या कुख्यात आरोपीला नागपूरच्या सदर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने आतापर्यंत आपल्या साथीदारांसह 15 हून अधिक घरफोडीचे गुन्हे (Crime) केले आहेत. आता पुन्हा त्याला जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. लकी गुजर असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लकी घरफोडीच्या आरोपातच तुरुंगात शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. सदर परिसरातील एका चोरीच्या प्रकरणात लकीला पुन्हा एकदा अटक करण्यात आले आहे.
एका घरफोडी प्रकरणाचा तपास करत असताना आरोपीला अटक
नागपूरच्या सदर परिसरातील एक कुटुंब काही दिवसांसाठी पुण्याला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत त्यांच्या घरामध्ये आरोपी लकीने आणि त्याच्या साथीदाराने घरफोडी केली होती. मोठी घरफोडी असल्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला असता, बाजूच्या वस्तीमध्ये लकी उर्फ गुजर राहत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हा कुख्यात घरफोडी करणारा असल्याने पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं. आरोपी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असून, नवीन कपडे खरेदी करत आहे हे पोलिसांच्या लक्षात येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी तुरुंगात डांबून त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यांनी या घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह अनेक वस्तूंची चोरी केली होती. त्याच्यासोबत त्याचा एक साथीदार सुद्धा होता. पोलिसांनी आता दोघांना अटक करून चोरीला गेलेला सगळं साहित्य हस्तगत केलं आहे. (Nagpur police arrested a notorious house burglar)