भरतीसाठी परीक्षा घेतो म्हणून पोलिसांना पत्र दिले, पोलिसांचा संशय खरा ठरला; सारं काही बनावट होतं
न्यायालयात तो कोणत्याही पदावर कार्यरत नाही. किंवा कोणत्याही पदावर त्याची नियुक्ती झालेली नाही. परीक्षा घेऊन युवकांची फसवणूक करण्याचा त्याचा उद्देश होता.
नागपूर : सर्वोच्च न्यायालय समितीचा डेस्क व सर्वेक्षण अधिकारी असल्याची बतावणी करून नागपुरात फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. विजय रणसिंग असं या आरोपीचं नाव आहे. त्याने शहरातील आदर्श विद्यामंदिर या शाळेत लिपिक वर्ग अ, ब, व ड तसेच शिपाई पदासाठी 20 उमेदवारांची परीक्षा आयोजित करीत असल्याचं सांगितलं. त्यासाठी पोलीस स्टेशनला पोलीस बंदोबस्त व शाळा प्रशासनाला शाळा व शिक्षक उपलब्ध करून देण्याचे खोटे लेटरहेड देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आला आणि त्याची कसून चौकशी केल्यावर तो ही माहिती पुढं आली. स्पेशल छब्बीस सिनेमा अशाच पद्धतीच्या कथानकावर अवलंबून आहे. या प्रकरणात बेरोजगारांची आणखी फसवणूक झाल्याची माहिती समोर येऊ शकते, असा संशय पोलीस उपायुक्त गोरक्ष भामरे यांनी व्यक्त केला.
आरोपी कोणत्याही पदावर कार्यरत नाही
एका व्यक्तीने कोतवाली पोलिसांना पत्र दिलं होतं. सर्वोच्च न्यायालय समितीत अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. नागपूर येथे लिपिक पदाची भरती होणार असल्याचं सांगितलं. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागितला होता. अशाच प्रकारचे पत्र संबंधित व्यक्तीने शाळेला दिले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी व्हेरिफाय केले असता पत्र फेक असल्याचे दिसून आले. संबंधिताची चौकशी केल्यानंतर हे सर्व बनावट असल्याचे त्याने कबुल केले. न्यायालयात तो कोणत्याही पदावर कार्यरत नाही. किंवा कोणत्याही पदावर त्याची नियुक्ती झालेली नाही. परीक्षा घेऊन युवकांची फसवणूक करण्याचा त्याचा उद्देश होता. आरोपी हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. सध्या नांदेड माहुर येथे राहतो. तसेच त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले.
अनेक उमेदवारांची फसवणूक
यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातून एकूण २० उमेदवारांकडून नोकरीच्या आमिषाने पैसे घेतल्याची माहिती आहे. पाच मार्च रोजी ही परीक्षा घेणार असल्याचं उमेदवारांना सांगितले होते. त्यांना फेक निवडीचे प्रमाणपत्र देऊन पैसे उकळण्याचा विजय रणसिंग याचा डाव होता. तो पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणात आणखी काही जणांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे. जे समोर येतील ते उघड होतील.