वाघाच्या भीतीने लोकं दहशतीत, जंगलात शेतकऱ्याचा पाडला फडशा
जंगलात जाण्यास गावकऱ्यांस मनाई करण्यात आली आहे. सकाळी किंवा संध्याकाळी जंगल परिसरात जाणे टाळावे, असं आवाहनही करण्यात आले.
शाहिद पठाण, गोंदिया : ही घटना आहे गोंदिया जिल्ह्यातली. अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon) तालुक्याच्या काही भागात दाट जंगल आहे. या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. इंदोरा येथील शेताशेजारील जंगलात विनय खगेन मंडल (Vinay Mandal) हे काही कामानिमित्त गेले होते. ते अरुणनगर येथील राहणारे आहेत. आज सकाळी विनय यांचा मृतदेहच सापडला. हा मृतदेह भयानक स्थितीत होता. शरीर अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत होते.
विनयची ही अवस्था पाहून गावकरी भयभित झाले आहेत. वनविभागाचे अधिकारी गावात पोहचले. त्यांनी गावात स्पीकर लाऊन अनाउंस केले. वनविभागाचे कर्मचारी म्हणाले, या परिसरात वाघ असल्याचे पुरावे सापडले आहे.
काहींनी या वाघाचा प्रत्यक्ष पाहिले, तर काहींनी अप्रत्यक्ष. त्यामुळं गावकऱ्यांनी जंगल परिसरात अजिबात जाऊ नये. जंगलात जाण्यास गावकऱ्यांस मनाई करण्यात आली आहे. सकाळी किंवा संध्याकाळी जंगल परिसरात जाणे टाळावे, असं आवाहनही करण्यात आले.
विनय मंडल यांचं वय पंचेचाळीस वर्षे होते. त्यांच्या मृत्यूने त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे. त्यांच्यामागे पत्नी पुष्पा व दोन मुले आहेत. एक मुलगा १६ तर, दुसरा १४ वर्षे वयाचा आहे.
विनय हे घरात कर्ते होते. सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळं त्यांच्या जाण्याने दुःख व्यक्त केले जात आहे.
अरुणनगर येथे विनय मंडल राहत होते. त्यांच्याकडं एक हेक्टर शेती आहे. शेतीशेजारी जंगल आहे. त्यामुळं ते तिकडं गेले होते. पण, वाघानं डाव साधून त्यांची शिकार केली.
तरुणाला वाघाने संपविले. त्यामुळं लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक दहशतीत आहेत. घराबाहेर पडायचे नाही काय, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. वाघाचा वनविभागानं बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.