नागपुरात भरदिवसा चाकूचा धाक दाखवत 20 लाख लुबाडणाऱ्या चोरट्याला बेड्या, पोलिसांनी कसं पकडलं?
चाकूचा धाक दाखवत 20 लाख रुपयांची लूट करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. तर दोन आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.
नागपूर : नागपुरात गुन्हेगारी काही थांबतात दिसत नाहीय. भर दिवसा 20 लाख रुपयांची लूट झाल्याने नागरिकांमध्ये धास्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. इतवारी हा मार्केटचा परिसर आहे. इथे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु असतो. त्यामुळे पैशाची ने-आन सुद्धा सुरु असते. मात्र याचा फायदा लुटारु घेत असल्याचं या घटनेने पुन्हा एकदा पुढे आलं. इतवारी मार्केट परिसरात चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत भर दिवसा एका कुरियर कंपनीच्या मॅनेजरकडून 20 लाख रुपये लुबाडले. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यापैकी एका चोरट्याला बेड्या ठोकल्या. त्यामुळे इतर चोरटेही लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
एका कुरियर कंपनीचा मॅनेजर स्कुटीने पैसे घेऊन आपल्या मालकाच्या घरी जात होता. मॅनेजर चालवत असलेल्या स्कुटीच्या डिक्कीत 20 लाखांची रोख रक्कम होती. मॅनेजर आपल्या मालकाच्या घरी ते पैसे घेऊन जात असताना तीन भामट्यांनी त्याला अडवलं. चोरट्यांनी मॅनेजरला चाकूचा दाख दाखवत गाडी हिसकावली. त्यानंतर ते स्कुटी घेऊन पसार झाले.
पोलिसांनी आरोपीला बेड्या कशा ठोकल्या?
मॅनेजरने तातडीने आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटनेची माहिती मालकाला दिली. मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस घटानस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातीस सीसीटीव्ही फुटेज तुपासले. त्यावेळी काही सीसीटीव्हीत चोरटे गाडीने पळताना दिसत आहेत. त्याच फुटेजच्या आधारावर पोलिसांनी एका चोरट्याला बेड्या ठोकल्या. तर दोन आरोपींची ओळख झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
नाशिकमध्ये सराफा दुकानातून 15 तोळे सोन्यासह 6 हजारांची रोकड लंपास
दरम्यान, नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी चोरीची धक्कादायक घटना समोर आली होती. नाशिकमधील सराफा दुकानातून शुक्रवारी (24 सप्टेंबर) भरदिवसा 15 तोळे सोने आणि 6 हजारांची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. नवीन नाशिकमधील बंदावणे नगर परिसरातील न्यू सद्गुरू ज्वेलर्स या सराफा दुकानात शुक्रवारी सकाळी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी 15 तोळे सोने आणि सहा हजारांची रोकड लंपास केली आहे. सद्गुरू अलंकारचे मालक प्रमोद विभांडीक यांनी सकाळी दुकान उघडले. त्यांना दुकानाजवळ पडलेली घाण साफ करायची होती. त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते दुकानातील मागच्या बाजूला गेले. त्यांनी किराना दुकानदाराला दुकानावर लक्ष ठेवायला सांगितले.
त्यानंतर या किराणा दुकानात दोन तरुण आले. त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. एक जण सराफा दुकानात घुसला आणि दुकानात ठेवलेली बॅग लंपास केली. एकूण 150 ग्रमॅ वजनाचे हे सोने असून त्याची किंमत 7 लाखांच्या घरात आहे. या धाडसी चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांच्यासह पोलिसांचे पथक दाखल झाले. सराफा दुकानात आणि दुकानाच्या परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत. त्यामुळे चोरटे या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा :
फरसाण खाताय तर सावधान! कचऱ्यातून फरसाण वेचणाऱ्या इसमाचा व्हिडिओ व्हायरल