नागपूर : शहरातील वाढत्या वर्दळीचा लुटारु प्रचंड गैरफायदा घेऊ लागले आहेत. विविध कंपन्यांच्या डिलीव्हरीसाठी दिवस-रात्र रस्त्यांवर फेरफटका मारणारे डिलीव्हरी बॉय देखील लुटारूंच्या नजरेतून सुटलेले नाहीत. अशाच एका गुन्ह्याच्या तपासात लुटारूंच्या टोळी (Gang)चा पर्दाफाश झाला आहे. नागपूर शहरातील बजाज नगर पोलिसांनी तीन लुटारूंना अटक (Arrest) केली आहे. झोमॅटो कंपनीच्या डिलीव्हरी बॉयची लूट (Loot) करताना ते पोलिसांच्या तावडीत सापडले.
लुटारुंच्या अधिक तपासात गुन्ह्यामागील हेतूचा उलगडा झाला आहे. हे गुन्हेगार नशा करण्यासाठी लुटमार करायचे. नशा करण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून त्यांनी लूटमारीचा धंदा चालवला होता.
एका डिलीव्हरी बॉयला लुटताना ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला रस्त्यात अडवून त्याच्याजवळील पैसे आणि साहित्याची लूट केली होती. हे तिघेही नशेखोर दोन जणांवर याआधी गुन्हेसुद्धा दाखल आहेत.
नागपूरचा बजाज नगर हा उच्चभ्रू वस्ती समजला जाणारा परिसर. या परिसरात झोमॅटोसारख्या अनेक कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय फिरत असतात.
अशाच एका डिलिव्हरी बॉयला आठरस्ता चौक ते सावरकरनगर चौक या परिसरात रात्रीच्या वेळी तिघा लुटारूंनी गाठले. त्यांनी त्याला मारहाणही केली आणि त्याच्याजवळ असलेले सगळे साहित्य आणि पैसे लुटून फरार झाले.
नंतर डिलीव्हरी बॉयच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लुटारूंचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.
लुटीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी शेजारच्या झोपडपट्टी भागातील काही युवकांनी लूट केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
हे आरोपी नशा करण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून अशा प्रकारे एखाद्याला पकडून लुटायचे आणि त्यातून नशा करायचे हे समोर आले आहे. अटक आरोपींसोबत त्यांच्या टोळीत आणखी किती लुटारू सहभागी आहेत, याचासुद्धा शोध पोलीस घेत आहेत.
हा परिसर उच्चभ्रू लोकांचा असल्याने अनेक घरांमध्ये डिलीव्हरी देण्यासाठी डिलीव्हरी बॉय रात्रीसुद्धा फिरत असतात. त्याचाच गैरफायदा लुटारूंनी घेतला, असे बजाज नगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी सांगितले.