राजभवन परिसरातून चंदनाची चोरी, एक आरोपी नागपूर पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांनी चंदनाचे झाड कापण्याचे साहित्य आणि कापलेला ओंडका जप्त केला आहे.
सुनील ढगे, Tv 9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला रंगेहात पकडण्यात यश मिळवलं. एक आरोपी मात्र फरार झाला. पहाटेच्या वेळी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वीच नागपुरातील राजभवन परिसरातून सुद्धा चंदनाचे झाड चोरी झाल्याचं पुढे आलं होतं.नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये चंदनाची झाड कापून चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते.
काही दिवसांपूर्वी नागपूर येथील राजभवनसारख्या संवेदनशील परिसरातून चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याचं पुढे आलं होतं. त्याचा तपास पोलीस करतच आहे. तोच पुन्हा एकदा सिव्हिल लाईन्स परिसरात एका बंगल्यामध्ये असलेल्या चंदनाच्या झाडाची कापून चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं.
कापलेला ओंडका केला जप्त
एक आरोपी मात्र पसार झाला. पोलिसांनी चंदनाचे झाड कापण्याचे साहित्य आणि कापलेला ओंडका जप्त केला आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या आरोपीला पकडण्यात आलं तो जालना जिल्ह्यातील असल्याचं त्यानं सांगितलं. चंदनाच्या झाडांची चोरी करणारी मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पोलीस आता या टोळीचा शोध घेत आहे. यासाठी पोलिसांनी एक टीमसुद्धा रवाना केली आहे. सोबतच या टोळीचं राजभवनातील चंदन चोरीच्या प्रकरणात काही धागेदोरे आहे का, याचासुद्धा शोध पोलीस घेत आहेत, असं एसीपी नीलेश पालवे यांनी सांगितलं.
अशी आहे चोरीची पद्धत
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ही चंदन तस्करांची टोळी पहिले चंदनाची झाड कुठे आहेत, याची रेकी करतात. त्यानंतर त्या झाडाचा ओंडका त्यांच्या कामात येणारा आहे का, याची पाहणी करतात.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणी जाऊन चंदनाचे झाड कापतात. त्या ठिकाणावरून फरार होतात. मात्र आता या टोळीतील एक सदस्य पोलिसांच्या हाती लागला. या टोळीचा लवकरच पर्दाफाश होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.