नागपूर : ड्रग तस्कर आणि वाढती व्यसनाधीनता यावर निर्बंध आणण्यासाठी आता नागपूर पोलिस काकांनी कंबर कसली आहे. यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण (Police Training) दिलं जात आहे. नागपूर शहरात गांजा, ड्रग्स, चरस आणि ब्राऊन शुगरच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. या वर्षाच्या सात महिन्यात अंमली पदार्थ (Drugs) विरोधी पथकाने एकूण 113 गुन्ह्यांची नोंद केली असून, तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त (Seized) करण्यात आले आहेत. नागपूर गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने यावर्षी सात महिन्यात एकूण 113 गुन्ह्यांची नोंद केली तर एकूण 172 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तर कोट्यवधींचे ड्रग जप्त केले आहे. त्यामुळे नागपूर हे ड्रग तस्करांचं हब बनत आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
युवकांमध्ये वाढती व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाची समस्या ही नागपुरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती व्यसनाधीनता ही सर्वात मोठी समस्या मानून त्यावर उपाय म्हणून पोलीस काका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ही संकल्पना पुढे आली आहे. पोलीस काकांच्या मदतीने नागपूर शहरातील विविध शाळा, कॉलेज, स्लम वस्तीत जाऊन जनतेमध्ये अंमली पदार्थाचे दुष्परिणाम सांगितले जाणार आहेत. सुरवातीला शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत 135 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नागपूर शहरातील दाट लोकवस्त्या, अपुऱ्या पायाभूत सुविधा, झोपडपट्या, गुन्हेगारी, दाटीवाटी आणि दारिद्र्य या समस्यांचा सामना नागपुरात निर्माण झाल्या आहेत. यामध्ये ड्रग्स आणि अंमली पदार्थांचा वाढता वापर समाजासाठी फारच घातक ठरत असल्याने नागपूर पालिसांनी शहराला ड्रग्स मुक्त करण्यासाठीचं पोलीस काका ही मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबईचे व्यसनमुक्ती सल्लागार बॉस्को डिसुजा हे मार्गदर्शन करत आहेत. मात्र पोलिसांनी आता कंबर कसली असली तरी त्यांना कितपत यश मिळत हे सुद्धा पाहावं लागणार आहे. (Special training for Nagpur police to prevent increasing addiction)