होळीनिमित्त गावी परतत असताना झाला घात; कारमधील दोन जण जागीच गेले
बिसेन, संतलाल व रितू हे छत्रपती संभाजीनगर येथे काम करत होते. होळीनिमित्त त्यांना मूळ गावी बालाघाट येथे जायचे होते. आदित्य एकटा असल्याने पुण्याहून कारने नागपूरला येत होता.
नागपूर : नागपूर-मुंबई महामार्गावर कोंढाळीजवळ ट्रक व कारची धडक झाली. यात ट्रकने कारला चिरडले. या अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले. हे दोन मित्र होळीनिमित्त गावी परतत असताना हा अपघात झाला. नागपूर-मुंबई महामार्गावर कोंढाळीपासून ७ किमी अंतरावर खुर्सापार पोलीस चौकी जवळची घटना घडली. दोन जखमींना महामार्ग पोलिसांनी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. कोंढाळी येथील घटनेत वेगात जाणार्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणार्या कारला धडक दिली. त्यात कारचालकासह अन्य एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना काटोलजवळील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खुर्सापार येथील महामार्ग पोलीस केंद्राजवळ सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. कारचालक आदित्य सुखदेव माने (वय ३२, रा. पुणे) व बिसेन पवन मराठे (वय २२, रा. बालाघाट) अशी मृतांची नाव आहेत.
जखमींवर कोंढाळी आरोग्य केंद्रात उपचार
संतलाल कमललाल पंचेश्वर (वय २५) व रितू संतलाल पंचेश्वर (वय २0, जि. बालाघाट) अशी जखमींची नावे आहेत. चौघेही कारने छत्रपती संभाजीनगर येथून अमरावतीमार्गे नागपूरच्या दिशेने येत होते. खुर्सापार शिवारात वाराणसी येथून नागपूर-अमरावतीमार्गे मुंबईच्या दिशेने जाणार्या ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कार रस्त्यावरच उलटली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर उपचार सुरू आहे.
तीन जण जात होते गावाला
बिसेन, संतलाल व रितू हे छत्रपती संभाजीनगर येथे काम करत होते. होळीनिमित्त त्यांना मूळ गावी बालाघाट येथे जायचे होते. आदित्य एकटा असल्याने पुण्याहून कारने नागपूरला येत होता. आदित्यने त्यांना प्रवासी म्हणून सोबत घेतले होते. अपघात झालेला राष्ट्रीय महामार्ग हा चौपदरी आहे. बहुतांश वाहने खूप जोराने जात असतात. शिवाय या महामार्गावर कोंढाळी-तळेगाव या लेनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या लेनवरील वाहतूक तळेगाव-कोंढाळी लेनवर वळवली आहे. दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.