शाहिद पठाण, TV9 मराठी, प्रतिनिधी, गोंदिया : शिकवत असताना कधीकधी शिक्षकाचा पारा भडकतो. मग, ते विद्यार्थ्यांना मारहाणही करतात. नियंत्रण ठासळल्यानंतर काहीतरी आगळीक घडतं. असाच काहीचा प्रकार हा गोंदियात घडला. आदिवासी विद्यार्थ्यांना (Student) शिक्षकाकडून (Teacher) मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रमशाळेत (Ashram School) हा प्रकार घडला. पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली. विद्यार्थ्याच्या डोक्यावर मार लागलेला आहे. त्यामुळं शिक्षकाला निलंबित करण्यात आलंय. आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी शिक्षकावर ही कारवाई केली.
देवरी तालुक्यात आदिवासी विभागा अंतर्गत शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. बोरगाव येथे निवासी शाळा असल्याने आदिवासी विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. पण पाचव्या वर्गात शिकत असलेल्या अक्षय पंधरे या विद्यार्थ्याला ठेंगरे नामक शिक्षकाने मारहाण केली. त्यामुळं अक्षय याच्या डोक्याला मार लागला.
अक्षयने संपूर्ण घटना आपल्या घरच्या लोकांना सांगितली. घरच्या लोकांनी प्रकल्प कार्यालयात शिक्षकाविरुध्द तक्रार दाखल केली. त्यामुळं प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तात्काळ शाळेत पोहचले. विद्यार्थ्याला उपचाराकरिता रुग्णालयात पाठविलं. चौकशीनंतर दोषी आढळल्यानं ठेंगरे या शिक्षकाला निलंबित केले.
शासन आदिवासी आश्रमशाळांवर कोट्यवधी रुपये खर्च करतो. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर अशा शिक्षकांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिक्षकाचं हे वागणं बर नव्हे, असं विद्यार्थ्याचे नातेवाईक गोंदू पनधरे यांनी सांगितलं.
संबंधित शिक्षक दोषी आढळल्यानं त्याला निलंबित केल्याची माहिती देवरीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी दिली.