मोबाईल टॉवरसाठी लागणाऱ्या हार्डवेअरच्या गोडाऊनमध्ये चोरी, महिला गँग जेरबंद
चोरी केलेल्या साहित्याची किंमत जवळपास 18 लाखाच्या घरात होती. ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या महिलांचा शोध सुरू केला.
नागपूर : नागपूरच्या वाठोडा पोलिसांनी चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करत त्यांना अटक करण्यास यश मिळविले आहे. या टोळीतील सात महिलांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने एका गोडाऊनमधून जिओ कंपनीच्या टावरला लागणाऱ्या 18 लाख रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केली होती. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. आरोपींपैकी चार महिला काही दिवसापूर्वीच जेलमधून सुटून बाहेर आल्या होत्या.
गोडाऊनमधील 18 लाखाच्या साहित्यावर डल्ला
मोबाईल टॉवरसाठी लागणाऱ्या हार्डवेअरचे गोडाऊन वाठोडा भागामध्ये आहे. त्या गोडाऊनमध्ये महिलांच्या टोळीने चांगलाच डल्ला मारला. या गोडाऊनमध्ये या महिलांनी शिरकाव केला आणि त्या ठिकाणी मोबाईल टॉवरसाठी लागणाऱ्या हार्डवेअरच्या साहित्याचे बॉक्स त्यांनी त्या ठिकाणावरून पळवले.
चोरी केलेल्या साहित्याची किंमत जवळपास 18 लाखाच्या घरात होती. ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पहाटेच्या वेळी या महिलांनी गोडाऊनमध्ये डल्ला मारला होता.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या महिलांचा शोध सुरू केला. त्या भंगार साहित्यामध्ये या वस्तू विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.
या गॅंगमध्ये सात महिला असून यातील चार महिला काही दिवसापूर्वीच जेलमधून सुटून बाहेर आल्या होत्या. मात्र बाहेर येताच त्यांनी आपले कारनामे दाखवायला सुरुवात केली. पोलीस आता यांनी आणखी कुठे अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या का? याचा शोध घेत आहेत.
आतापर्यंत अशा प्रकारच्या धाडसी चोऱ्या पुरुषांच्या गॅंग करत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता चक्क महिला गँगनेच अशा प्रकारे धाडसी दरोडा टाकल्याचं समोर आले आहे.